Afghanistan Crisis : प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका; हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:11 IST2021-08-19T06:10:53+5:302021-08-19T06:11:34+5:30
Afghanistan Crisis : हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.

Afghanistan Crisis : प्राध्यापिकांना काम करण्याची परवानगी, तालिबानची नवी भूमिका; हेरात विद्यापीठातील महिलांना दिलासा
- योगेश पांडे
नागपूर : अफगाणिस्तानमधील बहुतांश भाग तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न तणावात असलेल्या विद्यार्थिनी व महिलांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता तालिबानने काहीशी पुरोगामी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. हेरात विद्यापीठातील महिला प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थिनींना शिकण्याची मुभा देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.
‘लोकमत’ने तालिबानचा ताबा असलेल्या काही विद्यापीठांतील शिक्षणतज्ज्ञांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्वच विद्यापीठांतील विद्यार्थ्यांमध्ये सद्य:स्थितीत प्रचंड तणाव आहे. या पार्श्वभूमीवर कंधार विद्यापीठाप्रमाणे हेरात विद्यापीठात इस्लामिक एमिरेट्सच्या उच्च शिक्षण आयुक्तालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतील समन्वयानंतर झालेल्या निर्णयांची हेरात विद्यापीठाचे प्रमुख डॉ. मोहम्मद दाऊद मुनिर यांनी घोषणा केली. महिला प्राध्यापिका व कर्मचाऱ्यांना हिजाब घालूनच कामावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वर्ग लवकरच सुरू करण्याची तयारी करा, अशी सूचना त्यांनी केली.