अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:18 IST2023-03-30T13:18:10+5:302023-03-30T13:18:51+5:30
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सीरत कौर मान हिला खलिस्तानींनी तीन वेळा फोन करून धमक्या दिल्या आहेत.

अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या
पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंगविरोधातपंजाब पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. तो फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. असे असताना या कारवाईवरून भडकलेल्या खलिस्तानी समर्थकांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अमेरिकेतील मुलीला फोन करून धमक्या आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे.
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सीरत कौर मान हिला खलिस्तानींनी तीन वेळा फोन करून धमक्या दिल्या आहेत. सीरत ही तिचा भाऊ दिलशानसोबत अमेरिकेत राहते. मान यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. सीरतची वकील हरमीत कौर बराड हिने फेसबुक पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
खलिस्तानींनी सीरतला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केल्याचे बराड यांनी म्हटले आहे. खलिस्तानी घाणेरडे शब्द वापरून खलिस्तान मिळवू पाहत आहेत, असे तिने म्हटले आहे. कधी तुम्ही सोशल मीडियावर म्हणताय की मान यांच्या मुलांना घेरा, कधी तुम्ही तिथल्या गुरूंच्या घरी ठराव करता, काल तर हद्दच झाली, मान यांच्या मुलांना फोन करून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यापेक्षा भगवंत मान यांना घेरा. ज्यांनी तुमचे वाकडे केले आहे त्यांना शिव्या द्या. मुलांना घाबरवून कोणते खलिस्तान मिळणार आहे. मला वाटतेय की या देशात एकही चांगला व्यक्ती तुमच्यासारख्यांसोबत राहु इच्छिणार नाही. निर्लज्जपणाची देखील हद्द असते. शीख धर्म असले काही शिकवत नाही. तुम्ही शीख असूच शकत नाही, डाग आहात, अशी टीका कराड यांनी केली आहे.