इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:36 IST2025-11-13T21:36:11+5:302025-11-13T21:36:54+5:30
मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराणमध्ये जनतेचा असंतोष सध्या शिगेला पोहोचला आहे.

इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराणमध्ये जनतेचा असंतोष सध्या शिगेला पोहोचला आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील सुमारे ९२ टक्के नागरिक सरकारच्या सध्याच्या कारभारावर अत्यंत असंतुष्ट आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा संकेत आहे, ज्यामुळे सरकार आणि जनता यांच्यातील विश्वासाची भिंत वेगाने ढासळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियन यांनी १६ प्रांतांचा दौरा केला होता. याच दौऱ्यादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्याचा उद्देश जनतेचे मत जाणून घेणे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करणे हा होता. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, ५९ टक्के सहभागींनी खासदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे मत नोंदवले. प्रांतीय अधिकाऱ्यांनाही जनतेकडून सरासरी किंवा कमकुवत रेटिंग देण्यात आले आहे.
पश्चिमी निर्बंध आणि महागाईचा भस्मासुर
इराणची अर्थव्यवस्था पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे गंभीररित्या प्रभावित झाली आहे. तेल निर्यातीतील मोठी घट आणि चलनाच्या किमतीत झालेली मोठी घसरण यामुळे इराणची स्थिती बिकट झाली आहे. इराणचे चलन असलेला रियालची किंमत तब्बल ५९ टक्क्यांनी कमी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार महागाईचा दर ४० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.
इस्त्राईलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या महागड्या युद्धामुळेही इराणचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चांवरही नकारात्मक परिणाम झाला. आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सामाजिक आणि राजकीय तणाव वाढू नये म्हणून इराणला आता मूलभूत आर्थिक सुधारणा आणि ठोस धोरणात्मक उपाययोजनांची तातडीने गरज आहे.
४० टक्के लोक गरीबी रेषेखाली!
इराणमधील आर्थिक संकटामुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. गेल्या एका वर्षात गरीबी तब्बल ३० टक्क्यांनी वाढली आहे. इराणचे जवळपास ४० टक्के नागरिक सध्या गरीबी रेषेखाली जीवन जगत आहेत. देशातील बेरोजगारीचा दर १२ टक्क्यांच्या वर गेला आहे, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे.
बिगर-सरकारी अंदाजानुसार, वास्तविक महागाईचा दर ४० टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ९२% नागरिकांचा असंतोष हेच दर्शवतो की, सरकारी पातळीवर सक्रियता असूनही जनता विश्वास गमावत आहे. या गंभीर परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष पजेश्कियन यांच्या सरकारसमोर जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणे आणि देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था स्थिर करणे हे सर्वात मोठे आणि कठीण आव्हान आहे.