अभ्यास टाळण्यासाठी मुलानं लढवलं अशी युक्ती, घरी आले पोलीस, त्यानंतर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:03 IST2023-10-26T19:03:18+5:302023-10-26T19:03:39+5:30
Jara Hatke News: दररोज अभ्यास करणं कुठल्याच मुलांना आवडत नाही. अभ्यास करावा लागू नये, म्हणून मुलं वेगवेगळे बहाणे बनवत असतात. मात्र अशा बहाण्यांमधून कधीकधी काहीतरी वेगळंच घडतं. अशाच प्रकारची घटना चीनमध्ये घडली आहे.

अभ्यास टाळण्यासाठी मुलानं लढवलं अशी युक्ती, घरी आले पोलीस, त्यानंतर....
दररोज अभ्यास करणं कुठल्याच मुलांना आवडत नाही. अभ्यास करावा लागू नये, म्हणून मुलं वेगवेगळे बहाणे बनवत असतात. मात्र अशा बहाण्यांमधून कधीकधी काहीतरी वेगळंच घडतं. अशाच प्रकारची घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील लिशुई येथील सार वर्षांच्या एका मुलाने अभ्यास टाळण्यासाठी पोलिसांना फोन केला आणि वडील त्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी हा प्रकार कौटुंबिक हिंसाचाराचा असल्याचे मानून या तक्रारीची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी तक्रार केलेल्या ठिकाणी तातडीने धाव घेतली मात्र तिथे पोहोचताच पोलिसांना जे दिसले ते धक्कादायक होते.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये घरी पोहोचलेला अधिकारी मुलाला विचारतो की, तू पोलिसांना बोलावलंस का? तुला कुणी मारलं. तेव्हा तो मुलगा पोलिसांना सांगतो की, माझ्या वडिलांनी मला मारलं. तेव्हा पोलीस अधिकारी त्या मुलाच्या पाठीवर हलकी थाप मारून विचारतो की, तुला वडिलांनी असं मारलं का? तेव्हा मुलगा हो म्हणतो. त्यावर पोलीस अधिकारी म्हणतो की, मग तुला खूपच हलक्या हातानं मारलंय. त्यानंतर पुढच्या तपासामध्ये पोलिसांना आणखीच धक्कादायक माहिती समजली. या खट्याळ मुलाने अभ्यास न केल्याने शाळेत शिक्षकांचा ओरडा खावा लागू नये म्हणून ही युक्ती योजली होती. तसेच त्यासाठी त्याने स्वत:च्या वडिलांवरच गंभीर आरोप केले.
या मुलाने शाळेत जाणं टाळण्यासाठी ही कहाणी रचली होती. या मुलाला टेस्ट पेपरमध्ये दुरुस्ती करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र हा अभ्यास त्यानं केला नव्हता. त्यामुळे शिक्षक आपल्याला शिक्षा करतील, अशी भीती या मुलाला वाटत होती. मात्र पोलिसांनी या कृत्यामुळे मुलावर रागावण्याऐवजी त्याच्याकडून एकेक पेपर सोडवून घेतला.