भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 23:27 IST2025-11-24T23:26:45+5:302025-11-24T23:27:43+5:30
यापूर्वी १६ नोव्हेंबरलाही म्यानमारमध्ये ३.५ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, रविवारी भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.

भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
गेल्या काही दिवसांपासून भारताच्या शेजारील देशांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जानवत आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतानमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर, आता म्यानमारमध्येही पुन्हा एकदा भूकंपाचे झटके जाणवले आहेत.
म्यानमारमध्ये सोमवारी (२४ नोव्हेंबर, २०२५) सायंकाळी सुमारे ५:३० वाजता ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' या समाजमाध्यमावर दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू १३९ किलोमीटर एवढा खोल होता. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप -
यापूर्वी १६ नोव्हेंबरलाही म्यानमारमध्ये ३.५ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, रविवारी भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.
या मालिकेतील सर्वात मोठा भूकंप बांगलादेशात -
या मालिकेतील सर्वात मोठा भूकंप गेल्या शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) नोंदवला गेला. त्यावेळी, बांगलादेशात ५.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही जाणवले. या घटनेत बांगलादेशात किमान ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी पाकिस्तानमध्येही ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा परिणाम अफगाणिस्तानमध्येही दिसून आला.