आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:35 IST2025-08-07T10:35:40+5:302025-08-07T10:35:54+5:30

'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी  लँडिंग करावं लागलं.

A plane was flying in the sky, suddenly a large bird hit it; the plane suffered major damage, the passengers narrowly escaped! | आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

रविवारी मॅड्रिडहून पॅरिसला जाणाऱ्या 'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी  लँडिंग करावं लागलं. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती, कारण विमानाच्या केबिनमध्ये धूर भरला आणि ऑक्सिजन मास्क खाली आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रवाशांची घाबरलेली अवस्था आणि विमानाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

नेमकं काय घडलं?
आयबी ५७९ या विमानाने दुपारी ४:४२ वाजता मॅड्रिडहून उड्डाण घेतलं होतं. ठरलेल्या वेळेपेक्षा हे विमान सुमारे ३० मिनिटं उशिराने निघालं होतं. उड्डाणानंतर २० मिनिटांनी, ७,००० फूट उंचीवर असताना एक मोठा पक्षी विमानाचा पुढचा भाग आणि एका इंजिनला आदळला. या धडकेमुळे विमानात गंभीर बिघाड झाला आणि केबिनमध्ये धूर भरू लागला. एका प्रवाशाने सांगितलं की, “आधी आम्हाला वाटलं की ही सामान्य हवा आहे, पण नंतर विचित्र आवाज येऊ लागले. तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं.”

प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी ऑक्सिजन मास्क वापरत असल्याचं दिसत आहे. पार्श्वभूमीवर एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. एका महिला प्रवाशाने सांगितलं की, धुरामुळे श्वास घेणं कठीण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ इमर्जन्सी  प्रोटोकॉलचं पालन केलं आणि मॅड्रिड विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५० मिनिटं हवेत राहिल्यानंतर विमानाने रनवे ३२ एल वर सुरक्षित लँडिंग केलं. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने क्रू मेंबरच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली, ज्यामुळे एक मोठा अपघात टळला.

विमानाचं मोठं नुकसान
लँडिंगनंतर, विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे तुटलेला होता. रॅडोमचा मोठा भाग उडून गेला होता. तसेच, हवामानाचा अंदाज देणारं रडार अँटेना आणि उजव्या इंजिनलाही नुकसान पोहोचलं होतं. हे विमान इबेरियाच्या ताफ्यातील सर्वात नवीन विमानांपैकी एक होतं आणि फक्त दोन महिन्यांपूर्वीच ते सेवेत दाखल झालं होतं. आता हे विमान दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, या नुकसानीमुळे विमान दीर्घकाळ सेवेबाहेर राहू शकतं.

'इबेरिया एअरलाइन्स'ने एक निवेदन जारी करून सांगितलं की, "उड्डाणानंतर काही मिनिटांतच, आयबी ५७९ विमानाला एका मोठ्या पक्ष्याच्या धडकेचा सामना करावा लागला. त्यामुळे विमानाचा पुढचा भाग आणि एका इंजिनला नुकसान झालं. सुरक्षा नियमांनुसार, कॅप्टनने परत येण्याची परवानगी मागितली आणि विमान सुरक्षितपणे उतरलं. पायलट आणि केबिन क्रूने या परिस्थितीत व्यावसायिकता दाखवत प्रवाशांची काळजी घेतली."

Web Title: A plane was flying in the sky, suddenly a large bird hit it; the plane suffered major damage, the passengers narrowly escaped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.