न्यूयॉर्कहून दिल्लीकडे झेपावलेल्या एअर इंडियाच्या विमानात प्रवासादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ६ तास हवेत प्रवास केल्यानंतर विमानात विचित्र आवाज आणि थरकाप जाणवू लागल्याने वैमानिकाने तत्काळ खबरदारी घेत विमान आयर्लंडमधील शॅनन विमानतळाच्या दिशेने वळवले. या विमानात सुमारे ३०० प्रवासी होते, जे सध्या आयर्लंडमध्ये अडकून पडले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१५ मार्च) एअर इंडियाचे 'एआय १०२' हे ए३५० विमान न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर सुमारे ६ तास सर्व काही सुरळीत होते. मात्र, अचानक विमानातून विचित्र आवाज येऊ लागला आणि विमानाला कंपने जाणवू लागली. सुरक्षेचा विचार करता, वैमानिकाने आयर्लंडमधील शॅनन विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरले.
प्रवाशांचा जीव टांगणीला
विमान हवेत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच प्रवाशांच्या मनात धडकी भरली होती. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यामुळे आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व ३०० प्रवासी आणि चालक दल सुरक्षित असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. शॅनन विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय एअर इंडियाकडून केली जात आहे.
नव्याकोऱ्या विमानात बिघाडामुळे प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, हे ए३५० विमान एप्रिल २०२४ मध्येच एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते. अगदी नवीन असलेल्या विमानात अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उच्च सुरक्षा मानकांनुसार या विमानाची कसून तपासणी केली जात असून, या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे.
एअर इंडियाकडून दिलगिरी व्यक्त
या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एअर इंडियाने अधिकृत पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजे दिल्लीला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
"प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याची तपासणी सुरू आहे. प्रवाशांना लवकरात लवकर दिल्लीला पाठवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत," असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
Web Summary : An Air India New York-Delhi flight experienced a technical malfunction mid-air. The plane, carrying 300 passengers, diverted to Ireland's Shannon Airport. Passengers are safe, and Air India is arranging alternative travel. The brand-new A350 aircraft's fault is under investigation.
Web Summary : एयर इंडिया की न्यूयॉर्क-दिल्ली उड़ान में हवा में तकनीकी खराबी आई। 300 यात्रियों को लेकर विमान आयरलैंड के शैनन हवाई अड्डे पर उतरा। यात्री सुरक्षित हैं, और एयर इंडिया वैकल्पिक यात्रा की व्यवस्था कर रही है। बिलकुल नए A350 विमान की खराबी की जांच चल रही है।