कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा तब्बल ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:12 IST2025-01-15T11:11:52+5:302025-01-15T11:12:16+5:30
Steve Jobs Letter on Kumbh Mela: ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल ४.३२ कोटी रुपयांना लिलाव झाला आहे.

कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा तब्बल ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात?
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असलेल्या महाकुंभ मेळ्याला प्रयागराज येथे सुरुवात झाली आहे. आतापर्यंत येथील त्रिवेणी संगमामध्ये ५ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं असून, २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये सुमारे ४० कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल ४.३२ कोटी रुपयांना लिलाव झाला आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी हे पत्र मित्र टिम ब्राऊन यांना लिहिलं होतं. यामध्ये कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आयोजनाप्रति आपली ओढ स्टीव्ह जॉब्स यांनी प्रदर्शित केली होती. तसेच कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. हे पत्र समोर आल्यानंतर आता लॉरेन पॉवेल ह्या त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाकुंभमेळ्यामध्ये आल्या आहेत, असे मानले जात आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये आध्यात्मिकआणि काव्यात्मक बाजूची एक दुर्मीळ झलक दिसते. जॉब्स यांचं लिलाव झालेलं हे पहिलं खाजगी पत्र आहे. याची किंमत ५ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ४.३२ कोटी रुपये) एवढी आहे. स्टीव जॉब्स यांनी त्यांच्या १९ वाढदिवसावेळी हे पत्र बालपणीचे मित्र टीम ब्राऊन यांना संबोधित करताना लिहिलं होतं.
स्टीव जॉब्स यांनी हे पत्र ब्राउन यांनी हिलेलेल्या पत्राचं उत्तर म्हणून लिहिलं असावं, असं या पत्रातील उल्लेखामधून दिसून येतं. त्यात स्टीव्ह जॉब्स हे चिंतीत दिसत आहेत. तसेच मी अनेकदा रडलोय, असं सांगताना दिसत आहेत. या पत्रात स्टीव जॉब्स लिहितात की, मी कुंभमेळ्यासाठी भारतात जाऊ इच्छितो. तो एप्रिल महिन्यात सुरू होतो. मी मार्च महिन्यामध्ये कुठल्याही वेळी जाईन. मात्र याबाबत मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही, असं ते लिहितात. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्यावर हिंदू धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसत असून, त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी शांती, स्टीव्ह जॉब्स असं लिहिलेलं दिसत आहे.