प्लीज, माझ्या मुलांना नक्की रागवा! जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:23 IST2025-04-26T07:22:54+5:302025-04-26T07:23:18+5:30

पत्रकारितेच्या निमित्ताने तिने अनेक देशांचा प्रवास करताना तिथल्या पालकत्त्वाच्या पद्धतींचंही जवळून निरीक्षण केलं. या निरीक्षणांतून तिच्या हाती लागलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि रंजकही!

A journalist Marina Lopes traveled from Mozambique to Finland to find out how parents around the world pass this difficult test of parenting, and what secrets they have for it | प्लीज, माझ्या मुलांना नक्की रागवा! जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे, पण...

प्लीज, माझ्या मुलांना नक्की रागवा! जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे, पण...

‘मुलांना ओरडू नका, त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल’ किंवा ‘मुलांना मारू नका, मुलं तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करायला लागतील,’ असे अनेक सल्ले पालकांना सर्रास दिले जातात. त्यातूनच ‘जेंटल पॅरेंटिंग’ हा एक नवा प्रकार उदयाला आला आहे. मूल जन्माला घालणं कदाचित सोपं असेल, पण त्याचं पालकत्व ही मोठी अवघड परीक्षा असते, असं म्हणतात. जगभरातले पालक पालकत्त्वाची ही अवघड परीक्षा कशी देतात, त्यासाठी त्यांच्याकडे काय क्लुप्त्या आहेत, याचा शोध घेण्यासाठी मरिना लोपेस नावाच्या एका पत्रकार महिलेने ‘मोझांबिक ते फिनलंड’ असा प्रवास केला आणि त्यातून काही भन्नाट गोष्टी तिच्या समोर उलगडल्या. जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे. पण, जगात इतरत्र गेलात तर पालकत्व सोपं करायला अनेक गोष्टी आहेत. अमेरिकेत मात्र ती तुमची एकट्याचीच लढाई असते, असं निरीक्षण मरिना नोंदवते. 

कोरोनाच्या काळात आपल्या दोन मुलांचं पालकत्व निभावताना कुणाचीच मदत नसल्यामुळे त्रासलेल्या मरिना आणि तिच्या नवऱ्याने सिंगापूरला जाऊन राहायचं ठरवलं. तिथे जेरेमी आणि मेलिसा हे त्यांचे जवळचे मित्र राहात होते. त्यांच्या शेजारचं घर भाड्याने घेऊन राहताना पालकत्त्वाचं ओझं सुकर करण्यासाठी त्या चौघांनीही एकत्र प्रयत्न केले. विशेष म्हणजे, आपली मुलं आपल्या मित्रांकडे सोपवताना आपल्या मुलांवर ओरडायची परवानगीही त्यांनी एकमेकांना दिली. पालकत्त्वाची जबाबदारी वाटून घेणं, हा एक बदल केल्यावर आपण अधिक आनंदी, शांत झाल्याचं, आपला थकवा, ताण कमी झाल्याचं मरिना सांगते. त्यामुळेच ‘आपल्याला ज्यांच्या पालकत्त्वाच्या व्याख्या पटत नाहीत, त्यांच्यापासून आपलं मूल दूर ठेवणं ही पारंपरिक व्याख्या बरोबर आहे का’, याचा विचारही तिने पुन्हा सुरू केला.

पत्रकारितेच्या निमित्ताने तिने अनेक देशांचा प्रवास करताना तिथल्या पालकत्त्वाच्या पद्धतींचंही जवळून निरीक्षण केलं. या निरीक्षणांतून तिच्या हाती लागलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि रंजकही! त्या गोष्टींचं पुस्तक म्हणजे ‘प्लीज येल ॲट माय किड्स!’ जगभरातल्या पालकत्त्वाच्या क्लुप्त्यांची अंमलबजावणी तिने तिची मुलं वाढवताना केली आणि ते आपल्यासाठी फार सुखावह झालं, असंही ती सांगते. 

तिची ही निरीक्षणं काय होती? - सहसा लहान मुलांना काय येतं, असं समजून आपण त्यांना ‘हे/ते करू नकोस’ असं सांगत असतो. पण, मोझाम्बिकमध्ये तिला दिसलं ते चित्र वेगळं होतं. तिथे लहान लहान मुलांना घरातल्या कामांमध्ये अगदी सहजपणे सहभागी करून घेतलं जातं, हे तिच्या लक्षात आलं. डच पालक आपल्या मुलांना भरपूर स्वातंत्र्य देतात. स्वीडनमध्ये पालकत्व ही एकट्या आईची नाही तर पुरुषाचीही जबाबदारी असल्याचं दिसतं, अशी अनेक निरीक्षणं तिने नोंदवली आहेत. मूल वाढवणं, ही कुण्या एकट्याची जबाबदारी नाही तर ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असं ब्राझीलमध्ये मानलं जातं. मलेशियात पालकत्वाचं ओझं हलकं करण्यासाठी मित्र, पालक, आई-बाप आणि त्यांची मुलं एकत्र राहतात, असंही मरिनाचं निरीक्षण आहे.

नेदरलँड्समध्ये मुलांना जास्तीत जास्त स्वावलंबी करण्यावर पालकांचा भर आहे. अमेरिकेतल्या अनेक आई-बाबांना त्यांच्या पालकत्वाचा प्रवास सुखकर करण्यासाठी मदत हवी, असं वाटतं. पण, ती मदत कशी मिळवायची, हे मात्र त्यांना ठाऊक नाही. त्यांच्यासाठी मरिनाचं पुस्तक मार्गदर्शक ठरेल, अशी शक्यता आहे.

Web Title: A journalist Marina Lopes traveled from Mozambique to Finland to find out how parents around the world pass this difficult test of parenting, and what secrets they have for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.