पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:05 IST2025-12-03T15:05:04+5:302025-12-03T15:05:51+5:30
भारत आणि रशियाच्या सैन्य दलांना आतापर्यंत कधीही न मिळालेल्या सुविधा प्रदान करणार आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना धक्का बसू शकतो.

पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संरक्षण संबंधांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार पडला आहे. रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (स्टेट डूमा) रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट या महत्त्वाच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी ५ डिसेंबरच्या भारत भेटीपूर्वी हा करार मंजूर होणे, दोन्ही देशांसाठी एक मोठे यश मानले जात आहे.
हा करार भारत आणि रशियाच्या सैन्य दलांना आतापर्यंत कधीही न मिळालेल्या सुविधा प्रदान करणार आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना धक्का बसू शकतो.
'RELOS' करार नेमका काय आहे?
'RELOS' म्हणजे 'Reciprocal Exchange of Logistic Support'. या करारानुसार, भारत आणि रशियाचे सैन्यदल एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर करू शकणार आहेत. या करारामुळे भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेना यांना रशियाचे एअरस्पेस, लष्करी तळ , बंदरगाह आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट वापरण्याचा संपूर्ण हक्क मिळेल. भारतीय विमाने रशियन एअरस्पेसमध्ये परवानगीशिवाय उड्डाण करू शकणार आहेत. याचबरोबर विमानांमध्ये इंधन भरता येईल आणि शस्त्रे तसेच दारूगोळा पुरवता येणार आहे.
भारतीय जहाजे रशियन बंदरांवर उभी राहून देखरेख आणि दुरुस्ती करू शकतील. या बदल्यात रशियालाही भारतात अशाच प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत.
भारताला आर्कटिक प्रदेशात प्रवेश
हा करार भारतासाठी केवळ लॉजिस्टिक सपोर्ट नसून एक मोठे रणनीतिक पाऊल आहे. 'RELOS' मुळे भारताला आर्कटिक प्रदेशातील रशियाच्या नौदल बंदरांपर्यंत थेट प्रवेश मिळेल. या भागात रशियाची मोठी लष्करी उपस्थिती आहे. आर्कटिकमध्ये पोहोचल्यामुळे भारतीय नौदलाचा अनुभव वाढेल आणि ध्रुवीय प्रदेशात भारताच्या ऑपरेशनल क्षमतेचा विस्तार होईल.