करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 20:09 IST2025-10-27T20:07:07+5:302025-10-27T20:09:17+5:30
मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेत

करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
काबुल - अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबानने युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. अफगाण सरकार चर्चेतून मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी प्राधान्य देत आहे. आम्ही कुठल्याही संघर्षासाठी इच्छुक नाही परंतु जर आमच्यावर युद्ध थोपवणार असाल तर आम्हीही चोख उत्तर देऊ असा इशारा तालिबानी सरकारचे प्रवक्ते मौलवी जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिला आहे. नुकतेच पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर तालिबानने पलटवार केला आहे.
मौलवी जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, अफगाणिस्तान क्षेत्रीय अखंडतेवर कुठल्याही प्रकारे उल्लंघन सहन करणार नाही. आत्मरक्षणाचा अधिकार आम्हालाही आहे. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्याला नुकसान पोहचवण्यासाठी करू दिला जात नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले. मात्र तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सुरक्षित ठेवले जाते. हे दहशतवादी तिथून पाकिस्तानवर सातत्याने हल्ले करत राहतात असा दावा पाकिस्तानकडून केला जातो. मात्र तालिबानने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानला काय हवंय?
सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तुर्कीमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेला ३ दिवस झाले परंतु अद्यापही दोन्ही बाजूने अनेक मुद्द्यांवर संघर्ष आहे. पाकिस्तान टीटीपीविरोधात तालिबानचा पाठिंबा मागत आहे तर तालिबान अफगाणिस्तानमध्ये टीटीपी असल्याचा नकार देत आहेत. त्याशिवाय पाकिस्तानची प्रमुख मागणी अफगाणिस्तानने भारतापासून दूर राहावे. ज्याचा तालिबानने जोरदार विरोध केला आहे.
काय म्हणाले होते ख्वाजा आसिफ?
जर अफगाणिस्तानसोबत चर्चा अयशस्वी झाली तर पाकिस्तानकडे अफगाणिस्तानसमोर उघडपणे संघर्षात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकच्या डेली टाइम्सच्या मुलाखतीत सांगितले होते. शांतता चर्चेत पाकिस्तानने अफगाणिस्तानला तहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेला रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी केली आहे. मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेत. डूरंड लाइनवर दोन्ही देशात अनेकदा झटापट झाली. त्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे पाकिस्तानने या संघर्षामागे भारत असल्याचा आरोप केला.