६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने पहाटेच दिला दणका; लष्कराची विमानं आकाशात, नागरिकांची उडाली धांदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:14 IST2026-01-06T11:13:26+5:302026-01-06T11:14:15+5:30
जपानच्या पश्चिम भागाला मंगळवारी पहाटे भूकंपाच्या भीषण धक्क्यांनी हादरवून सोडले.

६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने पहाटेच दिला दणका; लष्कराची विमानं आकाशात, नागरिकांची उडाली धांदल
जपानच्या पश्चिम भागाला मंगळवारी पहाटे भूकंपाच्या भीषण धक्क्यांनी हादरवून सोडले. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे शिमाने प्रांतात मोठी खळबळ उडाली. पहाटेच्या वेळी जमिनीला बसलेल्या या धक्क्यांमुळे गाढ झोपेत असलेले नागरिक जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. जपानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू शिमाने प्रांताच्या पूर्व भागात होता.
सुनामीचा धोका टळला, पण भीती कायम
भूकंपाचे धक्के जाणवताच त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र सुदैवाने जपान हवामान संस्थेने कोणतीही त्सुनामीची चेतावणी जारी केलेली नाही. "समुद्राच्या लाटांमध्ये कोणताही असामान्य बदल झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी नोंदवली आहे.
लष्कराकडून हवाई पाहणी सुरू
भूकंपामुळे कोठे जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का, याचा शोध घेण्यासाठी जपानच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीने हवाई सर्वेक्षण सुरू केले आहे. लष्करी विमानांच्या सहाय्याने बाधित क्षेत्राची पाहणी केली जात आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही, ही दिलासादायक बाब आहे.
यासुगी शहरात फर्निचरची पडझड
शिमाने प्रांतातील यासुगी शहरात भूकंपाचे सर्वाधिक झटके जाणवले. जपानच्या 'शिंदो स्केल'नुसार येथे ५ तीव्रतेचे धक्के बसले. या पातळीवर घरातील कपाटं आणि फर्निचर कोसळते, तसेच रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांवरील नियंत्रण सुटण्याची भीती असते. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांतील रेल्वे सेवा काही काळ थांबवण्यात आली होती.