९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:30 IST2025-09-23T12:28:53+5:302025-09-23T12:30:28+5:30
अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवाशी खेळ करून एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे.

९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
अफगाणिस्तानच्या एका १३ वर्षांच्या मुलाने जीवाशी खेळ करून एक अत्यंत धोकादायक प्रवास केला आहे. हा मुलगा काबुलहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाच्या चाकांमध्ये लपून बसला आणि तब्बल ९४ मिनिटांच्या या थरारक प्रवासानंतर तो दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप पोहोचला. ही घटना रविवारी अफगाणिस्तानची एअरलाइन 'केएएम एअर'च्या 'आरक्यु४४०१' या विमानामध्ये घडली. मात्र, दिल्लीत उतरताच त्याला पुन्हा त्याच विमानाने परत पाठवण्यात आले.
नेमकं काय घडलं?
रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे विमान दिल्लीत उतरले. सर्व प्रवासी उतरल्यानंतर विमान जेव्हा टॅक्सीवेवर उभे होते, त्याचवेळी तेथे काम करणाऱ्या एका ग्राउंड स्टाफच्या नजरेस विमानाजवळ एक मुलगा फिरताना दिसला. त्याला पाहताच सर्वांना धक्का बसला, कारण एवढा वेळ तो जिवंत कसा राहिला हा प्रश्न सर्वांना पडला. तात्काळ या घटनेची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांना देण्यात आली.
का केला जीवघेणा प्रवास?
पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, हा मुलगा अफगाणिस्तानमधील कुंदुज शहराचा रहिवासी आहे. त्याने विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, तो काबुल विमानतळाच्या आतमध्ये घुसला आणि त्यानंतर विमानांच्या चाकांच्या जागेत लपून बसला. या धोकादायक प्रवासाचे कारण विचारले असता, त्याने फक्त उत्सुकतेपोटी असे केल्याचे सांगितले.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. सीआयएफएसच्या जवानांनी त्याला पुढील चौकशीसाठी टर्मिनल ३मध्ये आणले.
दिल्लीत उतरताच पुन्हा काबुलला पाठवले!
चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला. या अफगाणी मुलाला दिल्लीत ठेवण्याऐवजी, त्याला त्याच विमानात बसवून काबुलला परत पाठवण्यात आले. हे विमान दुपारी १२.३० वाजता काबुलसाठी रवाना झाले. केएएम एअरलाइनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी परत जाण्यापूर्वी लँडिंग गियर कम्पार्टमेंटची तपासणी केली असता त्यांना एक छोटा लाल रंगाचा स्पीकर सापडला, जो त्या मुलाचा असावा.
'व्हील-वेल स्टोवेज' काय आहे?
विमानांच्या चाकांमध्ये किंवा अंडरकॅरेजच्या आतमध्ये लपून प्रवास करण्याला 'व्हील-वेल स्टोवेज' असे म्हणतात. हा प्रवास अत्यंत धोकादायक मानला जातो, कारण जास्त उंचीवर ऑक्सिजनची कमतरता आणि खूप कमी तापमान असते. अशा प्रवासांमध्ये अनेकदा प्रवाशांचा मृत्यू होतो. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.