‘८६४७’ने कॉमी यांना घेरले, सिक्रेट सर्व्हिसकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:27 IST2025-05-18T13:25:17+5:302025-05-18T13:27:41+5:30
कॉमी यांनी पोस्ट डिलीट करीत याला कोणताही राजकीय संदर्भ नव्हता, असे जाहीरपणे सांगितले होते.

‘८६४७’ने कॉमी यांना घेरले, सिक्रेट सर्व्हिसकडून चौकशी
वॉशिंग्टन : शिंपल्यांनी तयार केलेल्या ‘८६४७’ संख्येच्या आकृतीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून वाद ओढवून घेणारे एफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांची ‘सिक्रिट सर्व्हिस’ने कसून चौकशी केली. ही पोस्ट म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाचा भाग असल्याचा आरोप रिपब्लिकन्सनी केला होता.
कॉमी यांनी पोस्ट डिलीट करीत याला कोणताही राजकीय संदर्भ नव्हता, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, अमेरिकी परंपरेतील ‘८६’चा अर्थ लावून कॉमी यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी किस्ती नोएम यांनीही कॉमी यांची चौकशी झाल्याची पुष्टी केली.
घटनाक्रम असा
एफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांनी १५ मे रोजी पोस्ट केली.
‘समुद्रकिनारी फिरताना शिंपल्यांचे एक शिल्प’ असे लिहून कॉमी यांनी ‘८६४७’ संख्येची आकृती पोस्ट केली.
यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसताच त्यांनी काही वेळताच ही पोस्ट डिलीट केली; पण यावरून निर्माण झालेला संशयकल्लोळ सुरूच राहिला.
आता सिक्रिट सर्व्हिसने त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
...म्हणून गंभीर दखल
अमेरिकी परंपरेत ८६ या संख्येचा अर्थ ‘काढून टाकणे’ किंवा ‘फेकून देणे’ असा लावला जातो. तर ४७ ही संख्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांशी जोडली आहे.
ट्रम्प या देशाचे ४७वे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे अर्थ लावून कॉमींच्या पोस्टची गंभीर दखल घेण्यात आली.