दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 21:36 IST2025-05-02T21:34:56+5:302025-05-02T21:36:30+5:30
Chile-Argentina Earthquake : यानंतर, देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी मोजली गेली. हा भूकंप समुद्रात आला, यामुळे जवळपासच्या परिसरातही याचे धक्के जाणवले. यानंतर, देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
त्सुनामीचा इशारा -
चिलीचे राष्ट्रपती गॅब्रिएल बोरिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट करत, किनारीपट्टीचा भाग रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. या तीव्र भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे, मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने म्हटले आहे.
घरातून बाहेर पडले लोक -
यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहरापासून २१९ किलोमीटर (१७३ मैल) दक्षिणेस समुद्राखाली होते. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांनी घरे सोडून रिकाम्या जागेकडे धाव घेतली. महत्वाचे म्हणजे, अद्याप कसल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक माध्यमांनुसार, चिलीतील पुंटा एरेनास आणि अर्जेंटिनातील रिओ गॅलेगोस या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.