6 lakh doctors in India, lack of 20 lakh nurses | भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सची उणीव
भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सची उणीव

वॉशिंग्टन : भारतात ६ लाख डॉक्टर आणि २० लाख परिचारिकांची टंचाई आहे, असे अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.
सेंटर फॉर डिसिज डायनामिक्टस, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अँटिबायोटिक्स उपलब्ध असतानाही ते देणारा योग्य प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे योग्य तो गुण येत नाही. अनेकदा अँटिबायोटिक्सच्या किमती रुग्णांना परवडत नाहीत. आरोग्य सेवेवरील भारत सरकारचा खर्च अत्यल्प असल्यामुळे औषधांचा खर्च रुग्णांना स्वत:च्या खिशातूनच करावा लागतो. भारतात आरोग्यावरील ६५ टक्के खर्च लोकांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो. या खर्चामुळे ५७ दशलक्ष लोक दरवर्षी गरिबीच्या खाईत ढकलले जातात. अँटिबायोटिक्सने सहज बऱ्या होणाºया साध्या आजारांनी जगात दरवर्षी ५.७ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. यातील बहुतांश मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत होतात. सीडीडीईपीचे संचालक रामनन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, अँटिबायोटिक्स रेसिस्टन्टन्सच्या तुलनेत अँटिबायोटिक्सअभावी मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
>भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर
‘सीडीडीईपी’ने युगांडा, भारत आणि जर्मनी या देशांत हितधारकांच्या मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष काढले आहेत. या देशांतील आरोग्य सुविधा अनेकदा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असतात. अहवालात म्हटले आहे की, १ हजार लोकसंख्येमागे १ डॉक्टर असावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा नियम आहे.
तथापि, भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर आहे. याचाच अर्थ भारतात ६ लाख डॉक्टर कमी आहेत. रुग्ण आणि परिचारिकांचे गुणोत्तर १:४८३ आहे. याचाच अर्थ भारतात २० लाख परिचारिका कमी आहेत.


Web Title: 6 lakh doctors in India, lack of 20 lakh nurses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.