अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:34 IST2025-10-12T15:31:24+5:302025-10-12T15:34:46+5:30
Afghanistan Pakistan Clashes: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून चकमक सुरू असून, तालिबानने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सीमेवरील संघर्षाचा भडका उडाला.

अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
Afghanistan Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पाकिस्तानने हवाई हद्दीचा भंग करत काबुलसह अफगाणिस्तानातील दोन ठिकाणी हल्ला केल्याचा दावा तालिबान सरकारने केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री दोन्ही देशातील संघर्ष पेटला. अफगाणिस्तानने पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांना निशाणा बनवले, यात ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने हा दावा केला आहे. सीमेवरील पाकिस्तानच्या २० चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या होत्या. त्या परत देण्यात आल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी (१२ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले, तर ३० जखमी झाले आहेत, असा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानच्या २० चौक्या तालिबानने घेतल्या होत्या ताब्यात
काबुलमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले, "सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार केला गेला. प्रत्युत्तरात तालिबानने गोळीबार केला. या चकमकीवेळी पाकिस्तानच्या २० चौक्यांवर अफगाणिस्तानने कब्जा केला होता. पण, संघर्ष कमी झाल्यानंतर त्या परत पाकिस्तानला दिल्या गेल्या आहेत."
इसिसचा म्होरक्या पाकिस्तानात
जबीहुल्लाद मुजाहिद म्हणाले की, "आयएसआयएसचा म्होरक्या पाकिस्तानात आहे. ही दहशतवादी संघटना सध्या खैबर पख्तूनख्वाह आणि बलुचिस्तानमध्ये सक्रीय आहे. अफगाणिस्तानातून आयएसआयएसचा सुफडा साफ झाला आहे. आयएसआयएसचे प्रशिक्षण अड्डे सध्या पाकिस्तानात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे."
अफगाणिस्तानने ५८ पाकिस्तानी सैनिक मारले असल्याचा दावा केला आहे. यावर अद्याप पाकिस्तानकडून कोणतेही उत्तर दिले गेलेले नाही.