अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:32 IST2026-04-06T12:32:38+5:302026-04-06T12:32:55+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर, आता दोन्ही देशांत ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी (सीझफायर) गुप्त चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?
अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुजची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर, आता दोन्ही देशांत ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी (सीझफायर) गुप्त चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
पडद्यामागे काय घडतंय? -
'Axios' या वृत्तसंस्थेने राजनयिक प्रयत्नांची माहिती ठेवणाऱ्या चार सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थी करत आहेत. अमेरिकेचे दूत स्टीव विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात गुप्तपणे संदेशांची देवाणघेवाण होत आहे. पुढील ४८ तासांत काही अंतिम करार होण्याची शक्यता कमी असली, तरी हा युद्ध टाळण्याचा 'अंतिम प्रयत्न' मानला जात आहे.
ट्रम्प यांनी नवी डेडलाईन दिली? -
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासंदर्भात दिलेली डेडलाईन २४ तासांनी वाढवली आहे. 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले, "मंगळवार, रात्री ८ वाजता (ईस्टर्न टाईम)."
ही पोस्ट त्यांच्या, "मंगळवारी, इराण वीज प्रकल्प दिन आणि पूल दिन एकत्र साजरा करेल. असे यापूर्वी कधीही घडले नाही!!! वेड्यांनो, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर तुम्ही नरकात जाल." या धमकीनंतर काही तासांतच आली. दरम्यान, रविवारी वॉल स्ट्रीट जर्नलशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "आपण खूप मजबूत स्थितीत आहोत आणि त्या देशाची (इराण) पुनर्बांधणी करायला २० वर्षे लागतील."
"हा धोकादायक खेळ थांबवणे हाच एकमेव मार्ग" -
ट्रम्प यांच्या या धमक्यांना इराण संसदेचे अध्यक्ष एम.बी. गालिबाफ म्हणाले, "युद्ध गुन्ह्यांतून काहीही साध्य होणार नाही. इराणच्या अधिकारांचा सन्मान करणे आणि हा धोकादायक खेळ थांबवणे हाच एकमेव मार्ग आहे."