१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 07:52 IST2025-04-21T07:51:34+5:302025-04-21T07:52:13+5:30

चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं.

20 robots ran alongside 12,000 humans; who finally won the marathon? | १२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?

१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?

चीनमधील बीजिंगच्या आग्नेय भागात असलेल्या यिझुआंगमध्ये नुकतीच एक मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनची जगभरात चर्चा व्हावी, असं त्यात काय विशेष होतं? 
- तर या मॅरेथॉनमध्ये माणसांबरोबर चक्क २० रोबोट्स (यंत्रमानव) धावले... आणि त्याहूनही महत्त्वाचं असं की, ही मॅरेथॉन अखेरीस जिंकली, ती हाडामासाच्या एका मानवी धावपटूनेच! यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या या ह्यूमनाॅईड मॅरेथॉनमध्ये सुमारे १२ हजार माणसांबरोबर २० विविध आकारांचे, रंगांचे आणि उंचीचे रोबोट्स सहभागी झाले होते.

२१ किलोमीटरचं चढ-उतारांचं अंतर सगळ्यांना कापायचं होतं. या अंतरात माणसे स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी पाणी प्यायली तर रोबोट्सनी आपल्या बॅटरीज बदलल्या. माणसांबरोबर स्पर्धा करताना रोबोट्स मागे पडत आहेत असं दिसलं तर त्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या androids मध्ये बदल करण्याची परवानगी होती. पण अशा प्रत्येक ब्रेकसाठी पेनल्टी म्हणून त्यांची १० मिनिटं कमी केली जात होती. बीजिंग ह्यूमनाॅईड रोबोट्स इनोव्हेशन सेंटरने तयार केलेल्या ‘तियान पोंग अल्ट्रा’ नावाच्या रोबोटने ही मॅरेथॉन पूर्ण करायला दोन तास चाळीस मिनिटं घेतली. युगांडाच्या जेकब किप्लिमोचं २१ किलोमीटर मॅरेथॉनचं रेकॉर्ड ५६.४२ मिनिटांचं आहे. प्रत्यक्षात ही मॅरेथॉन जिंकलेल्या स्पर्धकाने हे अंतर एक तास दोन मिनिटांमध्ये कापलं.

रोबोट्स हे आपल्या आयुष्याचा भाग आहेत हे पण रोबोट्स आता आपल्याबरोबर मॅरेथॉनही धावू लागले आहेत, ही बातमी तशी विशेषच! चीनमध्ये झालेल्या या ह्यूमनॉइड मॅरेथॉनमध्ये अनेक कंपन्या आणि विद्यापीठांच्या संघांनी आपले रोबोट्स उतरवले. तांत्रिकदृष्ट्या हे रोबोट्स उत्तम होते, पण मॅरेथॉनमध्ये माणसांना मागे टाकणं किमान या पहिल्या मॅरेथॉनमध्ये तरी त्यांना जमलेलं नाही. दुसरीकडे चीनला रोबोटिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही अमेरिकेशी स्पर्धा करायची असल्यामुळे या मॅरेथॉनमधून एकप्रकारे चीनने आपल्या ताकदीचं प्रदर्शनच केलंय. पहिल्या ह्यूमनाॅईड मॅरेथॉनमध्ये माणसांनी रोबोट्सना हरवलं असलं, तरी चीनने तयार केलेले रोबोट्स हे पाश्चात्त्य कंपन्यांनी तयार केलेल्या रोबोट्सपेक्षा उजवे असल्याचे विजेत्या कंपनीने म्हटलं आहे. 

चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं. इंटरनेटवर चीनच्या तांत्रिक प्रगतीचं दर्शन घडवणारा भरपूर कंटेंट पाहायला मिळतो. कधी तिथला एखादा रोबोट बाईक चालवत असतो. कधी ते मार्शल आर्टमधल्या टेक्निक्सचं प्रदर्शन करत असतात. आपलं बलस्थान म्हणून सोशल मीडियावरून त्याचा भरपूर गाजावाजाही चीनने चालवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञा  मानवी क्षमतांवर मात करतील का, भविष्यात त्यामुळे मानवी क्षमतांचं महत्त्व कमी होईल का? असे अनेक प्रश्न सातत्याने चर्चेत असतात. पहिल्या ह्यूमनॉइड मॅरेथॉननंतर तरी या प्रश्नांची मिळणारी उत्तरं ‘नाही’ अशीच असतील, असं चित्र आहे.

Web Title: 20 robots ran alongside 12,000 humans; who finally won the marathon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.