काय झालं, मी इथे का आहे?; दक्षिण कोरिया विमान अपघातातून वाचलेल्या दोघांना काहीच आठवेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:32 IST2024-12-30T08:49:59+5:302024-12-30T09:32:41+5:30
दक्षिण कोरियातील विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरले आहे.

काय झालं, मी इथे का आहे?; दक्षिण कोरिया विमान अपघातातून वाचलेल्या दोघांना काहीच आठवेना
South Korea Plane Crash: दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी भीषण विमानअपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानात बसलेल्या १८१ जणांपैकी फक्त दोनच जण वाचू शकले. अपघातात ठार झालेले लोक इतके भाजले होते की १७९ पैकी फक्त ६५ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. बचावलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र दोघेही सातत्याने 'काय झालं, मी इथे का आहे?' असे प्रश्न विचारत असतात. पण याचे उत्तर कोणाकडेच नाही.
गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या मोठ्या विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरले आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जेजू एअरचे प्रवासी विमान कोसळल्याने दक्षिण कोरियावर शोककळा पसरली आहे. या अपघातात विमानातील १८१ पैकी १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. रविवारी विमानतळावर हे विमान धावपट्टीवरून घसरले आणि काँक्रीटच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे विमानाला आग लागली. या अपघातात विमानातील १८१ जणांपैकी दोन वगळता सर्वांचा मृत्यू झाला.
जेजू एअर फ्लाइट ७C२२१६ (बोइंग ७३७-८००) १७५ प्रवासी आणि सहा क्रू सदस्यांसह बँकॉकहून येत होते. विमान सकाळी ९ च्या सुमारास विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना पक्ष्याच्या धडकेने क्रॅश लँड करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आणि विमान भिंतीवर आदळले. त्यामधून दोन फ्लाइट अटेंडंट्स असलेल्या एका पुरुषाला आणि एक महिलेला जळत्या विमानाच्या शेपटातून वाचवण्यात आले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
शुद्धीवर आल्यानंतर दोघांचा एकच प्रश्न आहे की शेवटी काय झालं? 'द कोरिया टाइम्स'च्या वृत्तानुसार, जेव्हा वाचलेल्या फ्लाइट अटेंडंटपैकी एक शुद्धीवर आला तेव्हा त्याने डॉक्टरांना विचारले, 'काय झाले? मी इथे का आहे?' शुद्धीवर आल्यानंतर एकाने सांगितले की, विमान उतरण्यापूर्वी त्यांनी सीट बेल्ट बांधला होता. परंतु क्रॅश लँडिंगनंतरच्या घटना त्यांना आठवत नाहीत.
रुग्णालयाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना जबर धक्का बसला आहे. दुसऱ्या वाचलेल्या व्यक्तीनेही अपघातात काय झाल्याचे आठवत नसल्याचे म्हटलं. माझं डोकं, घोटा आणि पोटात दुखत असल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून घोटा तुटला आहे. त्याच्या पोटाला झालेल्या दुखापतीच्या चाचण्या सुरू आहेत.
विमान अपघातानंतर दक्षिण कोरियाच्या सरकारने पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पुढील सात दिवस शोक जाहीर केला आहे. विमान काँक्रीटच्या कुंपणाला धडकल्यानंतर त्याला आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी असलेल्या विमानातून काळ्या धुराचे दाट लोटही बाहेर पडताना दिसत होते. कंट्रोल टॉवरने पक्ष्यांच्या धडकेची माहिती दिल्यानंतर विमानाने पुन्हा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला, ज्याला सुमारे तीन मिनिटे लागली.