१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:07 IST2024-10-02T13:07:04+5:302024-10-02T13:07:57+5:30
१९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे.

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
ढाका - पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवू मात्र आम्ही १९७१ विसरू शकत नाही असं स्पष्ट मत बांगलादेशातील अंतरिम सरकारने व्यक्त केले आहे. पाकिस्तानसोबतचे मतभेद दूर केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी इस्लामाबादला १९७१ वर बोलण्याचं धाडस करायला हवं, माफी मागायली हवी असं बांगलादेश सरकारमधील परराष्ट्र विभागाचे सल्लागार मोहम्मद तौहीन हुसैन यांनी मंगळवारी म्हटलं.
ढाका येथील पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाला इस्लामाबादशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर हुसैन म्हणाले की, बांगलादेश निश्चितच पाकिस्तानसोबत चांगले संबंध बनवू इच्छितो परंतु १९७१ आम्ही विसरलोय हा संदेश जायला नको. १९७१ मध्ये जे काही घडले ते आम्ही विसरू शकत नाही. दोन्ही देशातील संबंध सुधारतील जर पाकिस्तानने १९७१ मध्ये जे काही झाले त्याचा उल्लेख करण्याचं धाडस करेल आणि घडलेल्या घटनांवर माफी मागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक घेतली. ही बैठक शिष्टाचाराचा भाग होती त्याचा अर्थ १९७१ मध्ये जे घडले ते सर्वकाही विसरले असा होत नाही असंही स्पष्टीकरण परराष्ट्र खात्याचे सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी दिले.
पाकिस्तानसमोर ठेवणार परखड प्रश्न
शिष्टाचार बैठकीव्यतिरिक्त जेव्हा पाकिस्तानसोबत आम्ही चर्चेला बसू तेव्हा त्यांना परखड प्रश्न विचारू. बांगलादेश १९७१ बाबत सर्वकाही विसरून पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छिते अशाप्रकारे कुठलाही संदेश बाहेर जाऊ नये. १९७१ मध्ये जे घडले ते आमच्या मनात कायम राहणार आहे. १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. या परिस्थितीबाबत आमच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असं मोहम्मद तौहीद यांनी म्हटलं. १९७० आणि १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या बंगाली लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते. पाक लष्कराने बांगलादेशातील आंदोलन चिरडण्याचा निर्दयीपणे प्रयत्न केला होता. यामुळे बांगलादेशात पाकिस्तानबद्दल खूप चीड आहे. जी आजही दिसून येते.