१५० विमानं, सात स्फोट अन् डोळ्यावर पट्टी... अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना घरात घुसून कसं पकडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:25 IST2026-01-04T10:23:04+5:302026-01-04T10:25:01+5:30
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या घरात घुसून अटक केली आहे. अवघ्या ३० मिनिटांच्या या थरारक ऑपरेशनमध्ये मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले.

१५० विमानं, सात स्फोट अन् डोळ्यावर पट्टी... अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना घरात घुसून कसं पकडलं?
जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. एका अत्यंत गुप्त आणि वेगवान लष्करी मोहिमेद्वारे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या घरात घुसून अटक केली आहे. अवघ्या ३० मिनिटांच्या या थरारक ऑपरेशनमध्ये मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून व्हेनेझुएलातील मादुरो राजवट आता संपुष्टात आली आहे.
ऑपरेशन 'एब्सोल्यूट रिझॉल्व्ह': महिन्याभराची तयारी
या मोहिमेला 'एब्सोल्यूट रिझॉल्व्ह' असे नाव देण्यात आले होते. अमेरिकन गुप्तचर संस्था मादुरो यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. मादुरो कधी झोपतात, काय खातात, त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या सवयी काय आहेत, इथपर्यंतची सर्व माहिती गोळा करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, अमेरिकेने सरावासाठी मादुरो यांच्या महालाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती, जिथे कमांडो वारंवार सराव करत होते.
असा पार पडला ३० मिनिटांचा थरार
शुक्रवारी रात्री ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही मोहीम सुरू झाली. हल्ला करण्यापूर्वी व्हेनेझुएलातील एका शहराची वीज पूर्णपणे गुल करण्यात आली. व्हेनेझुएलाची हवाई सुरक्षा यंत्रणा निकामी केल्यानंतर अमेरिकेची १५० हून अधिक लढाऊ विमाने त्यांच्या आकाशात घुसली. आर्मी डेल्टा फोर्सच्या कमांडोनी हेलिकॉप्टरमधून थेट मादुरो यांच्या निवासस्थानावर हल्ला चढवला.
सेफ रूमचा दरवाजा गाठण्यापूर्वीच झडप
राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस हे जीव वाचवण्यासाठी 'सेफ रूम'कडे पळत होते. मात्र, त्या खोलीचा जाड पोलादी दरवाजा बंद करण्यापूर्वीच अमेरिकन कमांडोनी तिथे धडक दिली. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमांडोकडे स्टील कापण्यासाठी मोठे 'ब्लो टॉर्च' देखील होते. राजधानी कॅराकॅस सात मोठ्या स्फोटांनी हादरून गेली होती.
आता न्यूयॉर्कमध्ये चालणार खटला
अटकेनंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला तातडीने हेलिकॉप्टरद्वारे अमेरिकन युद्धनौकेवर नेण्यात आले. तिथून त्यांना अमेरिकेत हलवण्यात आले आहे. मादुरो यांचा एक फोटो समोर आला असून त्यात त्यांच्या डोळ्यावर पट्टी आणि हात बांधलेले दिसत आहेत. ट्रम्प प्रशासन आता न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार खटला चालवण्याच्या तयारीत आहे.
कौतुक आणि टीका
ट्रम्प यांनी या मोहिमेचे यश साजरे करत असतानाच, न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. "एका सार्वभौम देशावर अशा प्रकारे हल्ला करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून ही युद्धाची कृती आहे," असे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात काही अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत, तर वेनेझुएलाच्या बाजूने काही नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेतील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून, अमेरिकेच्या या पाऊलाचे जागतिक स्तरावर काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.