सोन्याच्या लालसेपोटी १०० मजुरांचा मृत्यू; खाणीतून बाहेर जाण्याचे दोर कापल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:18 IST2025-01-14T11:10:45+5:302025-01-14T11:18:55+5:30

दक्षिण आफ्रिकेत १०० खाण कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

100 workers trapped in a gold mine in South Africa die | सोन्याच्या लालसेपोटी १०० मजुरांचा मृत्यू; खाणीतून बाहेर जाण्याचे दोर कापल्याचा आरोप

सोन्याच्या लालसेपोटी १०० मजुरांचा मृत्यू; खाणीतून बाहेर जाण्याचे दोर कापल्याचा आरोप

Mining Workers Killed in South Africa: दक्षिण आफ्रिकेतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्या किमान १०० मजुरांचा यातना होऊन मृत्यू झाला. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटाने याबाबत माहिती दिली आहे. खाणीत अडकलेले हे मजूर अनेक महिन्यांपासून उपाशी होते. तसेच पाण्यासाठीही झुंजत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदेशीर खोदकाम करताना खाण कामगारांचा मृत्यू झाला होता.

दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत १०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही खाण अनेक दिवसांपासून रिकामी पडून असून त्यातून अवैधरित्या उत्खनन करण्यात येत होते. अनेक महिने हे कामगार खाणीत अडकले होते आणि त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. या घटनेत किमान १०० लोकांचा मृत्यू झाल्याचे खाण कामगारांच्या एका गटाचे म्हणणे आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. या घटनेचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात खाणीत डझनभर मृतदेह इकडे तिकडे पडलेले दिसत आहेत. हे सर्व मृतदेह खाणीच्या आत पडलेले असून ते प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफॉन्टेन शहराजवळील बफेल्सफॉन्टेन येथे असलेल्या सोन्याच्या खाणीत सुमारे १०० कामगार अडकले होते. मृत खाण कामगार अनेक दिवसांपासून बंद सोन्याच्या खाणीत अवैधरित्या खोदकाम करत होते. या काळात बाहेरून संपर्क तुटला आणि त्यांना अन्न-पाणी मिळणे बंद झाले. त्यानंतर या खाण कामगारांचा उपासमारीने मृत्यू झाला. या घटनेशी संबंधित माहिती कामगारांनी मोबाईल फोनद्वारे पाठवलेल्या व्हिडिओवरून मिळाली, ज्यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह दाखवले आहेत.

मायनिंग ॲफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन ॲक्शन ग्रुपच्या म्हणण्यानुसार, मदत कार्यादरम्यान आतापर्यंत २६ मजुरांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे आणि १८ मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, ही खाण एवढी खोल आहे की, सुमारे ५०० कामगार अजूनही तेथे अडकले असावेत. खाणीची खोली २.५ किमी असल्याचे सांगितले जाते. अजून किती मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि किती जणांना वाचवण्यात यश आले, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी खाणी सील करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कामगार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अटकेच्या भीतीने कामगार बाहेर पडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर पोलिसांनी दोरी काढल्याचा आरोप कामगार करत आहेत, त्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत.

दरम्यान, मृतांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूचे पहिले कारण उपासमार असल्याचे सांगण्यात आले आहे. खाणीतील अन्न व पाणीपुरवठा बंद पडल्याने सर्व कामगारांचा मृत्यू झाला. कामगारांच्या मृत्यूमुळे खाणीच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बेकायदेशीर खाण ही दक्षिण आफ्रिकेतील एक सामान्य समस्या आहे. जेव्हा मोठ्या कंपन्या खाणी निरुपयोगी समजून त्या सोडतात तेव्हा स्थानिक खाण कामगार उरलेले सोने काढण्याचा प्रयत्न करतात. 

Web Title: 100 workers trapped in a gold mine in South Africa die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.