"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:01 IST2026-04-07T15:57:29+5:302026-04-07T16:01:36+5:30
Strait of Hormuz: मध्य पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून धोकादायक परिस्थितीतून नुकत्याच परतलेल्या एका भारतीय मर्चेंट नेव्ही अधिकाऱ्याने तिथे अनुभवलेला थरार अंगावर काटा आणणारा आहे.

"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
मध्य पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून धोकादायक परिस्थितीतून नुकत्याच परतलेल्या एका भारतीय मर्चेंट नेव्ही अधिकाऱ्याने तिथे अनुभवलेला थरार अंगावर काटा आणणारा आहे. या भागात परिस्थिती इतकी भयावह आहे की, आकाशात सतत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन घोंघावत असून एका मिनिटांत १०० हून अधिक स्फोटचा आवाज ऐकायला येतो. होर्मुझची समुद्रधुनीच्या ओलांडताना जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे, असेही नेव्ही अधिकाऱ्याने सांगितले.
इंडिया टुडे'शी बोलताना भारतीय मर्चेंट नेव्हीचे कॅप्टन राम कपूर यांनी या मार्गावरील भीषण परिस्थितीचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की, मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हा प्रदेश जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्गांपैकी एक बनला आहे. या भागात त्यांच्या डोक्यावरून वारंवार क्षेपणास्त्रे झेपावत असतात. अवघ्या ३० ते ४० मिनिटांच्या कालावधीतच १२० ते १३० स्फोट होतात. "प्रत्येक क्षणी असे वाटत असते की, पुढचा स्फोट आमच्या जहाजावर होईल. ते पुढे म्हणाले की, हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील तेल साठ्याची वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, ३ हजारांहून अधिक जहाजे इथे अडकून पडली आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचा प्रचंड साठा जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
जीव धोक्यात टाकून प्रवास
जहाजांना लक्ष्य केले जाऊ नये, म्हणून अनेक कंपन्या आपल्या कॅप्टनवर एआयएस बंद करण्याचा दबाव टाकत आहेत. सिग्नल बंद केल्यामुळे जहाज रडारवरून गायब होतात. मात्र, अशा स्थितीत प्रवास करणे अत्यंत कठीण असते. आधुनिक उपकरणांऐवजी केवळ जुना चार्ट आणि कंपासच्या जोरावर, संपूर्ण अंधारात जहाज चालवून हा मार्ग पार करावा लागत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ
अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, छोट्या शिपिंग कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. मार्ग बदलण्यास किंवा सिग्नल बंद करून प्रवास करण्यास नकार दिल्यास, कर्मचाऱ्यांना भविष्यात नोकरी न देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मोठ्या कंपन्यांकडे शेकडो जहाजे असल्याने त्या धोका पत्करत नाहीत. मात्र केवळ २-४ जहाजे असलेल्या छोट्या कंपन्या आर्थिक नुकसानीच्या भीतीने आपल्या कर्मचाऱ्यांना युद्धक्षेत्रात ढकलत आहेत. सध्या अनेक भारतीय कर्मचारी या भागात अडकले आहेत. काहींनी यशस्वीरीत्या हा मार्ग पार केला असला, तरी अनेक जहाजे अजूनही सुरक्षित प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत.