रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:35 IST2025-12-29T07:33:41+5:302025-12-29T07:35:37+5:30
नोकरीच्या शोधात रशियाला गेलेले आणि तिथे फसवणुकीने रशियन सैन्यात भरती झालेले तब्बल १० भारतीय तरुण युद्धभूमीवर मारले गेल्याचा दावा एका तरुणाने केला आहे.

रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या आगीत भारतीय तरुण होरपळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीच्या शोधात रशियाला गेलेले आणि तिथे फसवणुकीने रशियन सैन्यात भरती झालेले तब्बल १० भारतीय तरुण युद्धभूमीवर मारले गेल्याचा दावा एका तरुणाने केला आहे. जालंधरमधील गोरेया येथील जगदीप कुमार याने हा खळबळजनक दावा केला असून, यामुळे पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भावाचा शोध घेताना समोर आले भीषण वास्तव
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप कुमार यांचा भाऊ मनदीप हा रशियात बेपत्ता झाला होता. भावाचा शोध घेण्यासाठी जगदीपने चक्क दोनवेळा रशियाचा दौरा केला. पहिल्यांदा २१ दिवस आणि दुसऱ्यांदा तब्बल दोन महिने रशियात राहून त्याने आपल्या भावासह इतर भारतीयांचा शोध घेतला. भाषेची अडचण आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याने गोळा केलेल्या कागदपत्रांनुसार, रशियन सैन्यात सहभागी असलेल्या १० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यात ३ तरुण पंजाबचे असून ७ तरुण उत्तर प्रदेश आणि जम्मू भागातील आहेत. याशिवाय ४ भारतीय तरुण अद्याप बेपत्ता असल्याचेही त्याने सांगितले.
खासदार बलबीर सिंह सीचेवाल यांची सरकारकडे धाव
या घटनेने खळबळ उडाली असून राज्यसभा खासदार संत बलबीर सिंह सीचेवाल यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून रशियन सैन्यात भारतीय तरुणांची होणारी भरती तातडीने थांबवण्याची विनंती केली आहे. "ज्या तरुणांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे पार्थिव भारतात आणून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करावे, जेणेकरून त्यांच्यावर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतील," अशी भावनिक साद सीचेवाल यांनी घातली आहे.
ट्रॅव्हल एजंटांच्या विळख्यात तरुण
अनेक ट्रॅव्हल एजंट चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतीय तरुणांना रशियाला पाठवतात आणि तिथे त्यांची रशियन सैन्यात सहायक म्हणून भरती केली जाते. या फसवणुकीवर कडक कारवाई करण्याची मागणीही खासदारांनी केली आहे. दरम्यान, भारत सरकारने सप्टेंबर महिन्यातच रशियाला अशा प्रकारची भरती थांबवण्याचे आवाहन केले होते आणि भारतीय नागरिकांना कोणत्याही लष्करी प्रस्तावांना बळी न पडण्याचा इशारा दिला होता.