भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 09:23 IST2025-10-24T09:23:14+5:302025-10-24T09:23:52+5:30
India Vs Pakistan: आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे, असे कारण पाकिस्तानने दिले आहे.

भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...
नवी दिल्ली/चेन्नई: पाकिस्तानचे क्रीडा क्षेत्र उध्वस्त होताना दिसू लागले आहे. भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या एफआयएच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानने आपल्या संघाचे नाव काढून घेतले आहे. भारतासोबतचा तणाव आणि सुरक्षा अशी दोन कारणे देत पाकिस्तानने पळ काढला आहे.
२८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत चेन्नई आणि मदुराई येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने या स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आहे. तसेच २०२३ मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ देखील भारतात खेळून गेला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपवेळी मात्र पाकिस्तान संघाने भारतात न खेळण्याची भूमिका घेतली होती. परंतू, हॉकी संघाला सुरक्षेची कोणती काळजी लागली आहे, हे पाकिस्तानलाच माहिती आहे.
पाकिस्तान हॉकी महासंघाचे सचिव राणा मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आपल्या सरकारचा सल्ला घेतला आहे. सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. विद्यमान राजकीय तणावामुळे ज्युनियर संघाला भारतात पाठवणे शक्य होणार नाही, कारण हा एक मोठा सुरक्षा धोका असणार आहे, असे सरकारने म्हटले आहे. तसेच आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे.
पाकिस्तानच्या ज्युनियर संघाने यापूर्वी ऑगस्टमध्ये आयोजित केलेल्या आशिया कप स्पर्धेतूनही माघार घेतली होती. त्या माघारीमुळे त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची पात्रता गमवावी लागली होती. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतून माघार घेण्यासाठी क्रिकेटमधील नाराजीचे आणि 'हस्तांदोलन न करण्या'चे कारण देणे हास्यास्पद मानले जात आहे.