भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:15 AM2019-06-19T02:15:45+5:302019-06-19T02:16:18+5:30

भारतीय महिला हॉकी संघाची फिजीवर ११-० अशी एकतर्फी मात

Indian women FIH Series finals semifinals | भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत

भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत

Next

हिरोशिमा : गुरजीत कौरने हॅट्ट्रिकसह नोंदविलेल्या चार गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने फिजीवर ११-० ने एकतर्फी मात करीत एफआयएच महिला हॉकी सिरीज फायनल्सची उपांत्य फेरी गाठली.

गुरजीतने १५, १९, २१ आणि २२ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी गोलजाळीत धडक दिली. मोनिकाने ११ आणि ३३ व्या मिनिटाला दोन गोल केले. याशिवाय लालरेम्सियानीने चौथ्या, राणी रामपाल १० व्या, वंदना कटारियाने १२ व्या, लिलमा मिंझ ५१ व्या व नवनीत कौर हिने ५७ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताने सुरुवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. संपूर्ण ६० मिनिटात फिजी संघाला एकदाही भारतीय गोलफळीवर हल्ला करता आला नाही.

पहिल्या क्वार्टरमध्ये चौथ्या मिनिटाला लालरेम्सियानी हिने खाते उघडल्यानंतर कर्णधार राणीने दहाव्या मिनिटाला दुसरा गोल केला. पुढच्या मिनिटाला मोनिकाने नेहा गोयल हिच्या पासवर गोल नोंदवून आघाडी तिप्पट केली. आक्रमक फळीतील वंदना कटारियाने १२ व्या मिनिटाला गोल नोंदविला. यानंतर गुरजीत कौर ‘शो’ पहायला मिळाला. तिने चारही गोल १५ ते २२ अशा सात मिनिटांच्या खेळात नोंदविले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये मोनिकाने ३३ व्या मिनिटाला नववा गोल नोंदविला. लिलमा आणि नवनीत यांनीही गोल आघाडीत भर घातली. भारताला शनिवारी उपांत्य सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)

आता लक्ष्य उपांत्य
सामना जिंकण्याचे असेल. शानदार खेळ करीत बाद फेरी गाठणे उत्साहजनक आहे. कामगिरीतील सातत्याच्या बळावर आम्ही गटात अव्वल स्थान गाठले. उपांत्य सामना कुणाविरुद्ध होईल याला महत्त्व नाही, आम्ही केवळ आपल्या खेळावर लक्ष देणार आहोत. सर्वोत्कृष्ट कामगिरीसह स्पर्धा जिंकायची आहे.
- राणी रामपाल, कर्णधार

Web Title: Indian women FIH Series finals semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.