Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:03 AM2018-12-13T05:03:51+5:302018-12-13T05:04:27+5:30

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे.

Hockey World Cup 2018: India-Netherlands quarterfinal match today | Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

Hockey World Cup 2018: भारत-नेदरलँड्स यांच्यात उपांत्यपूर्व सामना आज

Next

भुवनेश्वर : विश्वचषक स्पर्धेत ४३ वर्षांनंतर सुवर्ण विजयाचे स्वप्न उराशी बाळगून घरच्या मैदानावर यशस्वी घोडदौड करीत असलेल्या भारतीय हॉकी संघापुढे खरे आव्हान गुरुवारी असेल. विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत नेदरलँड्स संघाविरुद्ध यशस्वी होण्याचे कडवे आव्हान भारतापुढे आहे. प्रतिस्पर्धी संघाने गेल्या दोन सामन्यात तब्बल दहा गोल नोंदवून आक्रमक मनसुबे जाहीर केले.
विश्व क्रमवारीत नेदरलँड चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेच्या क गटात तीन सामन्यात दोन विजय आणि एक ड्रॉ यासह अव्वल स्थान मिळवले. नेदरलँडने ड गटात दुसरे स्थान गाठले. मंगळवारी क्रॉस ओव्हरमध्ये या संघाने कॅनडाचा पाच गोलने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती.

खच्चून गर्दीचा अनुभव असलेल्या कलिंगा स्टेडियमवर चाहत्यांना भारताचा पुन्हा एक विजय पाहायचा आहे. भारताने याआधीचा अखेरचा साखळी सामना ८ डिसेंबर रोजी खेळला होता. प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यानुसार खरी स्पर्धा बाद फेरीपासूनच आहे. भारतीय संघ नेदरलँड्सचे आव्हान परतविण्यास सज्ज असल्याचे त्यांचे मत आहे. प्रशिक्षकाच्या आत्मविश्वासामुळे भारताने तिसऱ्या स्थानावरील बेल्जियमला रोखले, हे विशेष.

सिमरनजित सिंग, ललित उपाध्याय, मनदीप सिंग आणि ओडिशाचा ड्रॅग फ्लिकर अमित रोहिदास यांच्यासह सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. बचावफळीनेदेखील निराश केले नाही. अखेरच्या मिनिटाला कच खाण्याची वृत्तीदेखील खेळाडूंनी संपविली आहे.
दुसरीकडे नेदरलँडने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १८ गोल नोंदविले. साखळीत मलेशियावर ७-० आणि पाकिस्तानवर ५-१ असा विजय नोंदविला. जर्मनीकडून मात्र त्यांचा १-४ असा पराभव झाला होता. प्रशिक्षक मॅक्स केलडास यांनी कबुली दिली की, ‘कलिंगावर भारताला नमविणे सोपे नाही. प्रतिस्पर्धी प्रेक्षकांचा दबाव असेल. पण माझे खेळाडू अनुभवी असून सामना जिंकण्यास सज्ज आहेत.’ लंडन ऑलिम्पिक २०१२ आणि विश्वकप २०१४ मध्ये नेदरलँडच्या महिला हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू आणि जिंकू.’ 

पहिल्यांदा नेदरलँड्सला नमविण्याचे लक्ष्य
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत नेदरलँड्सविरुद्धचा रेकॉर्ड सुधारला आहे. मागील नऊ सामन्यात उभय संघ प्रत्येकी चार सामने जिंकले. एक सामना ड्रॉ झाला. विश्वचषकात दोन्ही संघ सहावेळा परस्परांविरुद्ध खेळले. सर्व सहा सामने नेदरलँडने जिंकले. १९७१ पासून सुरू झालेली ही स्पर्धा भारत १९७५ ला एकदाच जिंकला. १९९४ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीसह भारत पाचव्या स्थानावर होता. दुसरीकडे स्पर्धेत सर्वात यशस्वी संघांपैकी एक मागचा उपविजेता नेदरलँड तीनवेळा (१९७३, १९९० आणि १९९८) विश्वविजेता राहिला आहे. गुरुवारी दुसरा उपांत्यपूर्व सामना जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला जाणार आहे.

आक्रमक हॉकीत कुठलाही बदल होणार नाही. मोठ्या संघांविरुद्ध चांगला खेळ करण्याचा आम्हाला अनुभव आहे. नेदरलँड्सलाही हरवू शकतो. सध्याचा संघ मोठ्या संघाला घाबरणारा नसल्याने यंदा विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतणार नाही, याचा मला विश्वास आहे.’
- हरेंद्रसिंग, मुख्य प्रशिक्षक, भारत

Web Title: Hockey World Cup 2018: India-Netherlands quarterfinal match today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.