भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 06:41 IST2025-10-15T06:41:37+5:302025-10-15T06:41:50+5:30
गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते.

भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
जोहोर (मलेशिया) : भारताच्या ज्युनिअर पुरुष हाॅकी संघाने चुरशीच्या सामन्यात मंगळवारी पाकिस्तानला सुलतान जोहोर चषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात ३-३ असे बरोबरीत रोखले. परंतु, या सामन्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांसह केलेल्या हातमिळवणीची. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना हाय फाइव्ह दिल्यानंतर सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले.
गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. तसेच, सध्या सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने पाक संघासोबत हात मिळवले नव्हते. परंतु, मंगळवारी भारतीय हाॅकीपटूंनी राष्ट्रगीत झाल्यानंतर पाक खेळाडूंना हाय फाइव्ह दिले. सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा रंगली. त्याआधी, पाकिस्तानच्या खेळाडूंना आधीच मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
याबाबत पाकच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘खेळाडूंना सांगितले गेले आहे की, जर भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन केले नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जायचे.’
दरम्यान, भारताने दोन गोलांनी पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत आघाडी घेतली, परंतु पाकिस्तानने अखेरच्या क्षणी गोल करून सामना अनिर्णीत राखला. भारताकडून अरिजित सिंग हुंडल (४३वे मिनिट), सौरभ कुशवाहा (४७) आणि मनमीत सिंग (५३) यांनी, तर पाकिस्तानकडून हन्नान शाहिद (५) आणि सूफियान खान (३९ व ५५) यांनी गोल केले.