आशिया कप महिला हॉकी :भारताचा सलग दुसरा विजय, चीनवर ४-१ ने मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:01 IST2017-10-31T00:01:06+5:302017-10-31T00:01:19+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू कामगिरी करताना आशिया कप हॉकी स्पर्धेत सोमवारी चीनचा ४-१ ने पराभव केला. काकामिगहराच्या कावासाकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारतातर्फे गुरजित कौर (१९ वा मिनिट), नवज्योत कौर (३२ वा मिनिट), नेहा गोयल (४९ वा मिनिट) आणि कर्णधार राणी रामपाल (५८ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले.

आशिया कप महिला हॉकी :भारताचा सलग दुसरा विजय, चीनवर ४-१ ने मात
काकामिगहरा : भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू कामगिरी करताना आशिया कप हॉकी स्पर्धेत सोमवारी चीनचा ४-१ ने पराभव केला. काकामिगहराच्या कावासाकी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत भारतातर्फे गुरजित कौर (१९ वा मिनिट), नवज्योत कौर (३२ वा मिनिट), नेहा गोयल (४९ वा मिनिट) आणि कर्णधार राणी रामपाल (५८ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले. यापूर्वी सलामी लढतीत भारताने सिंगापूरचा १०-० ने धुव्वा उडवला होता.
भारतीय संघाने आज सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. पहिल्या क्वार्टरमध्ये संघाने पेनल्टी कॉर्नरही वसूल केला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये संधी गमावल्यानंतर दुसºया क्वार्टरमध्ये चौथ्या मिनिटाला ड्रॅगफ्लिक स्पेशालिस्ट गुरजित सिंगने शनदार गोल नोंदवीत भारताला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराच्या दोन मिनिटांनेतर कौरने मैदानी गोल नोंदवीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, ३८ व्या मिनिटाला भारतीय बचाव फळीच्या चुकीचा लाभ घेताना चीन पेनल्टी कॉर्नर मिळवला व त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. अखेरच्या क्वार्टरमध्ये चीनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
दरम्यान, नेहा गोयलने भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाला दोन पेनल्टी कॉर्नरवर तर चीनला एका पेनल्टी कॉर्नरवर गोलची नोंद करता आली नाही. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना राणीने मैदानी गोल नोंदवीत भारताचा विजय निश्चित केला. भारतीय संघाला आज मंगळवारी गटातील अखेरच्या लढतीत मलेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)