छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:03 IST2024-12-30T16:01:35+5:302024-12-30T16:03:25+5:30
मृत युवतीचे गूढ अखेर उलगडले; आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगरात तरुणीची हत्या, मृतदेह औंढ्यात फेकला; मॉलच्या बिलाने आरोपी सापडला
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : अज्ञात युवतीच्या मृतदेहाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. सदर मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील युवती अलका बाजीराव बेद्रे हिचा असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले. मुगट (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील रहिवासी असलेल्या हत्येच्या आरोपीस तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून ताब्यात घेण्यात आले.
२४ डिसेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडीजवळ वन विभागाच्या जंगलात एका अज्ञात युवतीचा मृतदेह आढळून आला. शव विच्छेदनानंतर युवतीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने औंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी कोणताही पुरावा आढळून आला नसल्यामुळे पोलिसांसमोर प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. सतत चार दिवस ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र घेऊन स्थानिक गुन्हा शाखा व औंढा पोलिसांचे पथक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तपास करीत होते. परंतु मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले नाही. शेवटी पुन्हा घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली असता, घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोठी बॅग व संभाजीनगर येथील एका मॉलचे बिल मिळून आले. त्याआधारे तपासाची दिशा निश्चित करून तपास सुरू करण्यात आला.
याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले व सदर मृत युवती ही जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे एक पथक २९ डिसेंबर रोजी जामखेड येथील मृत महिलेच्या घरी जाऊन छायाचित्र दाखविले असता सदर मृतदेह हा अलका बाजीराव बेद्रे हिचा असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीवरून समांतर तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेने आरोपीचा शोध लावत मुगट (जि. नांदेड) येथील रहिवासी असलेल्या श्रीकांत सुरेश पिनलवार यास हत्येच्या आरोपाखाली आदिलाबाद येथून ताब्यात घेतले.
सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, माधव जिव्हारे, कपिल आगलावे, अंमलदार पांडुरंग राठोड, कोंडिबा मगरे, विक्रम कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, आकाश टापरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इमरान सिद्दिकी, इकबाल शेख, मदार शेख आदींनी केली.
असा घडला गुन्हा
सदाफुले वस्ती जामखेड येथील अलका बाजीराव बेद्रे (वय २९) हिची मुगट (जि. नांदेड) येथील तरुणाशी काही काळापूर्वी प्रवासादरम्यान भेट झाली. भेटीतून मोबाइल नंबरची घेवाण- देवाण झाली. पुढे प्रेमसंबंध निर्माण होऊन गत नऊ महिन्यांपासून दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने चांगले व्यवस्थित राहिल्यानंतर श्रीकांत हा अलकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. दरम्यान, वारंवार वाद होत असल्याने तिने दुसऱ्याशी सलगी वाढविली. याचा राग मनात धरून श्रीकांतने २३ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर परिसरातील लाडगाव येथील भाड्याच्या रूममध्ये रात्री अलका हिचा गळा दाबून खून केला. मृतदेह एका प्रवासी वाहनाने औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी शिवारात आणून टाकला. याप्रकरणी आरोपी श्रीकांतला ताब्यात घेण्यात आले असून, सदर हत्या प्रकरणात आणखी कितीजण सहभागी होते, मृतदेह नेमका कोणत्या वाहनात आणण्यात आला आदी तपास औंढा पोलिसांकडून करण्यात येत आहे.