तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला तरुण शेतकऱ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:25 IST2019-07-11T16:18:49+5:302019-07-11T16:25:29+5:30
शेत आखाड्याजवळ विद्युतवाहिनी तुटून खाली पडली होती

तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला तरुण शेतकऱ्याचा बळी
आडगाव रंजे ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील कळंबा येथील एका तरुण शेतकऱ्याचा तुटलेल्या विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि. १०) सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
कळंबा येथील तरुण शेतकरी मुंजा गुलाबराव सावंत (३०) हे कळंबा पाटी शिवारात शेतातील आखाड्यावर कुटुंबासह होते. मात्र बुधवारी सायंकाळी ७ वाजेदरम्यान आखाड्याजवळ तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा जोराचा धक्का लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुंजा सावंत यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाच्या आकाली निधनाने कुटुंब उघड्यावर पडले आहे. तसेच या घटनेमुळे या परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.