चोरीनंतर नवे कपडे घातल्याने फसले; पोलिसांनी दोन तासातच चोरट्यांना ताब्यात घेतले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 19:16 IST2021-09-03T19:15:36+5:302021-09-03T19:16:59+5:30

शेकडो नागरिकांमधून चोरट्यांना नेमके हेरून श्वानाने त्यांची ओळख निश्चित केली. 

weared new clothes after theft and Police arrested the thieves within two hours | चोरीनंतर नवे कपडे घातल्याने फसले; पोलिसांनी दोन तासातच चोरट्यांना ताब्यात घेतले 

चोरीनंतर नवे कपडे घातल्याने फसले; पोलिसांनी दोन तासातच चोरट्यांना ताब्यात घेतले 

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील बोल्डाफाटा येथे एक रेडिमेडचे कापड दुकान व एक आॅटोमोबाईल्सचे दुकान चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम, लॅपटॉप व रेडिमेट कपडे असा एकूण 1 लाख 21 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुकाने फोडल्याची खबर मिळतात बाळापूर पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरविली. यातील पाचही चोरटे दोन तासात जेरबंद केले असून त्यांच्या जवळून मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी तालुक्यातील बोल्डाफाटा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन दुकानांची शटर वाकवून चोरट्यांनी आज पहाटे तीन ते पाच वाजेच्या सुमारास चोरी केली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. सिडीआर मशीन काढली. त्याचबरोबर ड्राव्हरमधले रोख दहा हजार रुपये, लॅपटॉप, कपडे, होम थेटर असा एकूण 1 लाख 21 हजार रुपयांचा माल चोरून नेला. दुकान फोडल्याची वार्ता बाळापूरचे ठाणेदार पी. सी. बोधनापोड यांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे गतिमान केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना याबाबतची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली तातडीने शोध पथके पाठविले. त्यातील एक आरोपी सोडेगाव रोडवर पकडला गेला तर तीन आरोपी एकाच दुचाकीवरून हिंगोलीत आढळले. त्यांना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले. 

रमेश नामदेव देवकर (वय 25 वर्ष ,रा.वडारवाडा ,हिंगोली),सोनू पिराजी पवार (वय 20 वर्ष, रा. कारखाना रोड ,वसमत),सुरेश नितीन जाधव (वय 21 ,रा.कारखाना रोड वसमत ),लखन सुदाम राव (वय 27 वर्ष , रा. सत्यगिरी नयना, शहरपेठ वसमत ) ,बालाजी उर्फ सिनु नागोराव गोरे ( राहणार वसमत शहर ) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. अत्यंत कमी वेळात आरोपी ताब्यात घेतल्यामुळे त्यांनी चोरलेला मालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, बीट जमादार शेख जावेद, नागोराव बाभळे, संजय मार्के, जोगदंड यांच्या पथकाने चोरटे शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले.

श्वानपथकाने चोरट्यांना ओळखले...
चोरट्यांनी त्यांचे अंगातले जुने कपडे काढून फेकत नवे घातले होते. त्याच्या वासावरून पोलीस श्वान ' मॅक्स' ने चोरांना ओळखले. श्वानहस्तक अर्जुन यादव, नारायण कावरखे यांनी श्वान पथकाचे काम पाहिले. शेकडो नागरिकांमधून चोरट्यांना नेमके हेरून श्वानाने त्यांची ओळख निश्चित केली. 

Web Title: weared new clothes after theft and Police arrested the thieves within two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.