वसमत तालुका पुन्हा भूकंपाने हादरला; तीन दिवसांतील दुसरी घटना, नागरिकांमध्ये भीती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:51 IST2026-01-01T18:50:26+5:302026-01-01T18:51:49+5:30
दोनच दिवसांपूर्वी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी पहाटे सुद्धा तालुक्यात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला होता.

वसमत तालुका पुन्हा भूकंपाने हादरला; तीन दिवसांतील दुसरी घटना, नागरिकांमध्ये भीती!
वसमत: तालुक्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० डिसेंबरच्या धक्क्यानंतर,१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी पुन्हा एकदा तालुक्याच्या विविध भागांत भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. सततच्या या धक्क्यांमुळे नागरिक जीव मुठीत धरून घराबाहेर धावत सुटले होते.
गुरुवार रोजी सायंकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रामुख्याने पांगरा शिंदे, आंबा, कुरुंदा,डोनवाडा, खांबाळा, सुकळी, कोठारी यासह अनेक गावांना भुकंपाचा धक्का बसला यावेळी भांडी-वस्तू हालल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. अनेक ठिकाणी नागरिक घाबरून रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानात जमा झाले होते.
दोन दिवसांतील दुसरी घटना
दोनच दिवसांपूर्वी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी पहाटे सुद्धा तालुक्यात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला होता. त्या धक्क्याची नोंदही झाली होती. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत पुन्हा धक्का बसल्याने जमिनीच्या पोटात नक्की काय हालचाली सुरू आहेत, याबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून जनजागृतीची मागणी
सतत जाणवणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरांना तडे जाण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "आम्ही सतत दहशतीखाली जगत आहोत, प्रशासनाने आता केवळ नोंद घेऊन न थांबता, या संदर्भात गावोगावी जाऊन जनजागृती करावी आणि आम्हाला सुरक्षिततेचे उपाय सांगावेत," अशी मागणी पांगरा शिंदे परिसरातील नागरिकांनी केली आहे.