भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:56 IST2026-02-19T19:55:54+5:302026-02-19T19:56:47+5:30
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

भररस्त्यातून ७ लाखांचे १२ महागड्या स्मार्टफोनचे पार्सल लंपास करणारा चोरटा जेरबंद!
वसमत (हिंगोली): शहराच्या बसस्थानक परिसरातून एका ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून चोरीला गेलेले ७ लाख ३७ हजार रुपये १२ महागडे स्मार्टफोन हस्तगत करण्यात वसमत शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकी घटना काय?
मर्सुळ येथील कुरिअर डिलिव्हरी बॉय दत्ता सोन्नर यांनी पुणे येथून आलेल्या मोबाईलच्या पार्सलबाबत तक्रार दिली होती. १३ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोनचे पार्सल एका ट्रॅव्हल्ससमोरून अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. भररस्त्यात झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
सीसीटीव्हीने केला गेम ओव्हर
पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस. बी. डेडवाल आणि डी.बी. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेख अरबाज शेख अफसर (वय २६, रा. दर्गा मोहल्ला, वसमत) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या अरबाजने खाकीचा हिसका मिळताच चोरीची कबुली दिली.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
पोलिसांनी आरोपीकडून सर्व १२ स्मार्टफोन (किंमत ७,३७,०५३ रुपये) हस्तगत केले आहेत. ही कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डेडवाल, इम्रान कादरी, अजय पंडित आणि त्यांच्या टीमने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.