गोळीबारात दोन ठार; दोघे जखमी, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 08:16 IST2025-09-24T08:15:58+5:302025-09-24T08:16:44+5:30

यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सुभाष कुरवाडे व बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

Two killed; two injured in firing incident at Bhandegaon in Hingoli taluka | गोळीबारात दोन ठार; दोघे जखमी, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील घटना

गोळीबारात दोन ठार; दोघे जखमी, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील घटना

हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात दोघे ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शेतीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

भांडेगाव येथील बाबाराव जगताप व कुंडलिक जगताप यांच्यामध्ये शेतीचा जुना वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच कुरबुर सुरू होती. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुंडलिक जगताप, त्यांचा मुलगा शिवराज जगताप तसेच सुभाष कुरवाडे व बालाजी जगताप यांना सोबत घेऊन बाबाराव जगताप यांच्या घरी गेले होते. त्यावेळी बाबाराव जगताप यांनी बंदुकीतून गोळीबार केला. यामध्ये कुंडलिक जगताप यांना तीन गोळ्या लागल्या तर त्यांचा मुलगा शिवराजच्या छातीवर गोळी लागली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सुभाष कुरवाडे व बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

 घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. जखमींवर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर भांडेगाव येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दरम्यान, याप्रकरणी बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप व ज्ञानेश्वर जगताप यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Two killed; two injured in firing incident at Bhandegaon in Hingoli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.