आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:14 IST2023-11-24T12:14:32+5:302023-11-24T12:14:46+5:30

पाच आणि तीन वर्षीय दोन्ही मुलांचा झाला बुडून मृत्यू

Two children who went to wash clothes with their mother drowned in Isapur dam | आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

- शेख इलियास
कळमनुरी (जि.हिंगोली):
आईसोबत गेलेल्या दोन चिमुकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घडली. आरुष ( ५) आणि प्रणव ( ३ ) अशी मृत चिमूकल्यांची नावे आहेत.

मोरगव्हाण येथील आम्रपाली अमोल खंदारे(३२) ही महिला आरुष ( ५) आणि प्रणव ( ३ ) या दोन चिमुकल्यांना घेऊन ती धुणे धुण्यासाठी गावालगत असलेल्या इसापूर धरणावर गेली होती. आम्रपाली कपडे धुण्यामध्ये व्यस्त असताना दोन्ही मुले खेळतखेळत पाण्यात उतरली.अचानक मुले दिसेनाशी झाल्याने आम्रपाली यांनी पाण्यात उडी घेत शोध सुरू केला. मात्र, त्या देखील बुडू लागल्या. शेजारील शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांनी हे दृश्य पाहताच आरडाओरड करत मदत मागितली. तेव्हा गावातील गजानन मस्के यांनी आम्रपाली खंदारे यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी ईसापुर धरणाकडे धाव घेत मुलांचा शोध सुरू केला. काही वेळाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह तुळशीराम भिसे यांनी पाण्याबाहेर काढले. शवविच्छेदनानंतर गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही मुलांवर  अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची अजूनही पोलिसात नोंद झालेली नाही.

Web Title: Two children who went to wash clothes with their mother drowned in Isapur dam