कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:35 IST2025-07-30T17:35:14+5:302025-07-30T17:35:39+5:30
सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) : सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे ३० जुलै रोजी सकाळी घडली. बाजीराव खंडेराव वडकुते (७२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बाभुळगाव येथील शेतकरी बाजीराव वडकुते यांना सर्व्हे क्रमांक ४२० मध्ये एक हेक्टर पाच आर. शेतजमीन आहे. गत तीन-चार वर्षांपासून एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे सतत नापिकी झाली. परिणामी, शेताचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यातच सन २०२० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून एक लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. डोईवरील कर्जाचा बोजा कसा फेडावा, या विवंचनेत ते होते. यात ३० जुलै रोजी सकाळी ते घरातून शेताकडे गेले. परंतु, घरी परत आले नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहिले. बाजीराव वडकुते यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती गोरेगाव ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद झळके व पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बाजीराव वडकुते यांच्या मृतदेहाचे गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.