सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:41 IST2025-11-07T15:40:38+5:302025-11-07T15:41:41+5:30
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत.

सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
डोंगरकडा (जि.हिंगोली) : आश्वासन देऊन देखील संपूर्ण कर्जमाफी न देणारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. पण, तुमच्यातही नांगर फिरविण्याची हिंमत आहे, हे लक्षात ठेवा आणि सरकारवर नांगर फिरवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना केले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे सरकार रजाकारापेक्षाही वाईट वागत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. दगाबाज सरकारला तुम्ही दगा द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि लोकशाहीतील मत चोरी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. जे मी घरी बसून केले ते त्यांनी लोकांमध्ये फिरवून करावे. भाजप सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असेच सांगितले होते, पण आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू, अशी भाषा सरकार वापरत आहे. त्यामुळे तुम्हीही असेच सांगा की योग्य वेळी आम्ही मतदान करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
एकजुटीने धडा शिकवा
मत चोरीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दुबार आणि तीबार मतदारांची नोंद झाल्याचे सांगून मत चोरी करून हे सरकार सत्तेत आल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, जे लोक मत चोरी करून आले आहेत आणि दगाबाजी करून कारभार करत आहेत, त्यांना शेतकऱ्यांनी एकजुटीने धडा शिकवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, बबनराव थोरात, खासदार नागेश आष्टीकर, हिंगोली जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, शेतकरी नेते पराग अडकिणे, बाळासाहेब गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या समस्यांच्या पाढा वाचला.