"गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!"; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:14 IST2025-12-20T16:14:10+5:302025-12-20T16:14:36+5:30
''कोणावर नाराजी नाही, फक्त विकासासाठीच भाजपमध्ये''

"गांधी घराणे माझे दैवतच, पण विकासासाठी भाजप हवा!"; प्रज्ञा सातवांचे पक्षांतरावर स्पष्टीकरण
हिंगोली: काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार प्रज्ञा सातव यांचे १९ डिसेंबर रोजी हिंगोलीत प्रथमच आगमन झाले. यावेळी भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. "मी कोणाच्याही नाराजीतून भाजपमध्ये आलेली नाही, तर केवळ हिंगोली जिल्ह्याचा विकास व्हावा याच भावनेने हा निर्णय घेतला आहे," अशी रोखठोक प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी यावेळी दिली.
गांधी घराण्याप्रती कृतज्ञता कायम
पक्षांतर केले असले तरी जुन्या नात्यांमधील ओलावा प्रज्ञा सातव यांनी जपल्याचे पाहायला मिळाले. "सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमच्या कुटुंबाला कठीण काळात सावरले. ते आयुष्यभर माझ्यासाठी दैवतच राहतील," असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. राजकारणात येणारे अनेक जण जुन्या पक्षावर टीका करतात, मात्र प्रज्ञा सातव यांनी केवळ विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय
भाजप सरकारकडून राज्यभरात वेगाने विकासकामे केली जात आहेत. आपल्या जिल्ह्यालाही याचा फायदा व्हावा, अशी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि जिल्ह्याच्या हितासाठीच आपण भाजपचे कमळ हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये नवा उत्साह
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी प्रज्ञा सातव यांचा सत्कार करत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या जनसंपर्कामुळे हिंगोलीत भाजपची ताकद दुपटीने वाढणार असल्याचा विश्वास मुटकुळे यांनी व्यक्त केला. या स्वागत सोहळ्याला बाबाराव बांगर, शिवाजी मुटकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.