पोलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरधाव कारने व्यायाम करणाऱ्या तरुणीस चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:44 IST2023-03-02T08:44:14+5:302023-03-02T08:44:42+5:30
सुदैवाने या अपघातात इतर दोन तरुणी बचावल्या आहेत.

पोलिस बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले; भरधाव कारने व्यायाम करणाऱ्या तरुणीस चिरडले
-इस्माईल जहागिरदार
वसमत ( जि.हिंगोली): तालुक्यातील आंबा चौंडी फाट्याजवळ आज पहाटे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीस भरधाव कारने चिरडले. यात तीचा जागीच मृत्यू झाला. कन्याकुमारी कृष्णा भोसले असे मृत तरुणीचे नाव आहे.
वसमत तालुक्यातील आंबा चौंडी येथील काही तरुणीं पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कन्याकुमारी कृष्णा भोसले (१९) आणि इतर दोघी तरुणी व्यायम करण्यासाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, आंबा चौंडी फाट्याजवळ कन्याकुमारीस एका भरधाव कारने चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी थोडक्यात बचावल्या.
अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे, जमादार बालाजी जोगदंड, ज्ञानेश्वर ठोंबरे, जामकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून पोलिसांनी तरुणीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अपघातानंतर पसार झालेल्या गाडीचा पोलीस शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.