चोरट्यांची चलाखी, भरदिवसा सर्वजण घरात असताना ३६ तोळे सोने, दीड किलो चांदी पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:01 IST2022-12-13T12:01:20+5:302022-12-13T12:01:36+5:30
चोरी झाली तेव्हा कुटुंबातील सदस्य घरातच आपापल्या कामात व्यस्त होते.

चोरट्यांची चलाखी, भरदिवसा सर्वजण घरात असताना ३६ तोळे सोने, दीड किलो चांदी पळवली
- इस्माईल जहागिरदार
वसमत: शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या नवामोंढा भागात भरदिवसा चोरट्यांनी घरात प्रवेश करत लॉकर फोडून रोकड आणि दागिने असा ११ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणेज, ही चोरी सोमवारी दुपारी ३ ते पाच यावेळेत झाली आणि यावेळी घरातील सदस्य आतच होते. चोरट्यांनी मोठ्या चलाखीने कोणाच्या नजरेत न येता ही चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.
नवा मोंढा भागात सतिष विनोदकुमार बाहेती यांचे तीन मजली घर आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कोणालाही कळू न देता त्यांनी लॉकर असलेल्या खोलीत प्रवेश केला. संधी साधत लॉकर तोडून रोख १० हजार रुपये आणि ३६ तोळे २ ग्राम सोन्याचे दागिने, दीडकिलो चांदी असा एकूण ११ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
सायंकाळी ५ वाजेच्यानंतर बाहेती कुटुंबाला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, फौजदार राहुल महीपाळे, जमादार शेख हकीम, भगीरथ सवंडकर, यांनी पाहणी करत पंचनामा केला. ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी झाली तेव्हा बाहेती कुटुंब घरातच
सतिष बाहेती यांचे तीन मजली घर आहे. याच ठिकाणी बॅंक, बाजूला त्यांचे कृषी केंद्र आहे. चोरी झाली तेव्हा बाहेती कुटुंब घरीच आपापल्या कामात व्यस्त होते. नेहमीच दिवसा येथे वर्दळ असते याचाच फायदा चोरट्यांनी घेत डला मारला. बॅंक व आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही ही यावेळी बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्दळीच्या ठिकाणी धाडसी चोरी घटना घडताच शहरात खळबळ उडाली आहे.