ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 20, 2022 15:59 IST2022-09-20T15:58:44+5:302022-09-20T15:59:15+5:30
मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने कयाधू नदीच्या पात्रात विसर्जित होणाऱ्या भवानी ओढ्यास पूर आला.

ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला
नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : भवानी ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला आहे. शिवाजी लक्ष्मण पंडीत ( ४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कडती- काळकोंडी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने कयाधू नदीच्या पात्रात विसर्जित होणाऱ्या भवानी ओढ्यास पूर आला. दरम्यान, शिवाजी पंडित हे शेतकरी भवानी ओढ्याच्या शिवारामधील शेतात बैलजोडी घेऊन गेले होत. काम संपल्यास सायंकाळी ओढा ओलांडून पंडित घराकडे निघाले. ओढ्यातून बैलजोडी सुखरूप बाहेर पडली. मात्र, पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने पंडित त्यात वाहून गेले.
इकडे रात्र झाली तरी पंडित घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरु केला. शेतात ते आढळून आले नाही. यामुळे आज सकाळी ओढ्यात शोध घेतला असता पंडित यांचा मृतदेह आढळून आला. मृताच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.