हिंगोली : विनामास्क वावरणाऱ्या तसेच परवानगी न घेता लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवरही आता कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी तशी माहिती १६ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी काळातही नागरिक घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. तसेच विनामास्क नागरिकांची संख्याही मोठी आहे. विनापरवानगी लग्नसोहळे आयोजित केले जात असून, परवानगी घेतलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक उपस्थित राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या उपस्थितीत १६ मार्च राेजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानुसार यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे परवानगीशिवाय घेता येणार नसून परवानगी दिलेल्या लग्नसोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त नातेवाईक आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रात्रीची संचारबंदीतही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलीस पथके स्थापन केली असल्याचेही कलासागर यांनी सांगितले. तसेच विनामास्क आढळून आल्यासही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.