वारंगा-नांदेड महामार्गावर विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:56 IST2019-03-30T23:55:42+5:302019-03-30T23:56:04+5:30
वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

वारंगा-नांदेड महामार्गावर विचित्र अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
३० मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वारंगाकडून नांदेडकडे मोठे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक जीजे १२ बी.डब्ल्यू. २८५३ भाटेगावनजीक असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेजवळ अचानक उलटला. सदरील कंटेनरवर असलेले लोखंडी पाईप निसटल्याने एका उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळून तिचे नुकसान झाले. तर नांदेडकडून वारंग्याकडे येणारी एम.एच. २९ बी.सी. ३२३५ या कारवरही एक पाइप जाऊन आदळल्याने या कारचे समोरच्या बाजूने नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
या विचित्र अपघाताने नांदेडकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. वाहनांतील लोखंडी पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते.