चिंचोलीतील दारू बंद करा नाहीतर पोलिसांना बांगड्यांचा आहेर; मध्यरात्री महिलांचा ठिय्या

By विजय पाटील | Published: February 11, 2023 03:39 PM2023-02-11T15:39:09+5:302023-02-11T15:42:32+5:30

रात्री १२ वाजता ग्रामस्थांचा पोलिस अधीक्षक कार्यालयावर ठिय्या; गाऱ्हाणे मांडत असताना महिलांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते.

Stop illegal Liquor selling in Chincholi or will gifts bangels to the police; Women's Thiyya at midnight | चिंचोलीतील दारू बंद करा नाहीतर पोलिसांना बांगड्यांचा आहेर; मध्यरात्री महिलांचा ठिय्या

चिंचोलीतील दारू बंद करा नाहीतर पोलिसांना बांगड्यांचा आहेर; मध्यरात्री महिलांचा ठिय्या

Next

हिंगोली : शुक्रवारी रात्री दारू विक्रेत्याने चिथावणी दिल्याने मद्यपींनी चिंचोली येथील महादेव मंदिरावर गोंधळ घातला होता. यानंतर ग्रामस्थांनी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र, काही फायदा झाला नाही. आज पुन्हा मंदिरावर बसून दारू विक्रेत्यांना जेरबंद न केल्यास पोलिसांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा आ.प्रज्ञा सातव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली महादेव येथे अवैध दारू विक्रीने थैमान घातले आहे. याची तक्रार केली तर दारू विक्रेता मद्यपींना चिथावणी देवून धिंगाणा घालायला लावत आहे. शुक्रवारी याच कारणाने मंदिराच्या परिसरात मद्यपींनी गोंधळ केला. महिला, पुरुषांनी चार टेम्पो भरून रात्री १२ च्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. मात्र वरिष्ठ अधिकारी फिरकले नाही. इतर काही अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन देवून माघारी पाठविले.

शनिवारी सकाळी पुन्हा महिलांनी मंदिरावर ठिय्या मांडला. दारू विक्री वाढल्याने संसार कसे उद्ध्वस्त होत आहेत, याचा पाढा वाचला. मजुरी करून पतीला दारूला पैसे द्यावे लागत आहेत. मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नाचा प्रश्न आहे. शिवाय वाद घालतात. भांडणे होतात. दारूची उधारी न फेडल्याने मारहाण होते, असे सांगण्यात आले. आ.प्रज्ञा सातव यांनीही येथे भेट दिली.

..तर आम्ही दारू पकडून देतो
आ. सातव यांनी महिलांचे गाऱ्हाणे ऐकून दारू विक्रीच्या ठिकाणी तुम्ही जावून ती पकडली नाही. तर आम्ही तुम्हाला पकडून देतो. तुम्ही फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बघा, असा इशारा दिला. त्यावर पोनि श्रीमनवार यांनी लगेच कारवाईचे आश्वासन दिले.

बांगड्यांचा आहेर देणार
वारंवार महिला तक्रारी करीत असूनही जर या गावातील अवैध दारू विक्री बंद होत नसेल तर पोलिस काय करतात? यापुढे येथे दारू विक्री पुन्हा सुरू झाली तर पोलिस प्रशासनाला थेट बांगड्यांचा आहेर देण्याचा इशाराही आ. प्रज्ञा सातव यांनी दिला.

अनेकांच्या डोळ्यात अश्रु
या गावात अनेक घरात दारू पिणारे आहेत. सर्वांनाच त्रास आहे. यात भांडणे व आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे आ. प्रज्ञा सातव यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडत असताना महिलांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते.

दोन पोलिस कर्मचारी निलंबित
या गावातील दारूविक्री थांबवू न शकल्याने पोलिस जमादार बंडू राठोड व पोलिस कर्मचारी शहाजी बावणे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर या प्रकाराने संतापले असून आपल्या बिटात लक्ष न घालणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

Web Title: Stop illegal Liquor selling in Chincholi or will gifts bangels to the police; Women's Thiyya at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.