धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:28 IST2021-01-22T19:25:00+5:302021-01-22T19:28:40+5:30

या प्रकरणात आरोपी पतीला कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shocking! The husband took her to a secluded place and set her on fire; lost mother of two-month-old baby | धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली

धक्कादायक ! निर्जनस्थळी नेऊन पत्नीला दिले पेटवून; चिमुकलीची मायेची सावली बापानेच हिरावली

ठळक मुद्देमारकळ दाम्पत्यास दोन मुली आहेत. यातील एक मुलगी दोन महिन्यांची आहे.

कुरुंदा (जि. हिंगोली) : लग्न झाल्यापासून विविध कारणांनी वाद घालणाऱ्या पतीने निर्जनस्थळी नेऊन पत्नीला पेटवून खून केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे घडली. ही घटना २१ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणात आरोपी पतीला कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दांपत्याला दोन मुली असून यातील एक मुलगी केवळ २ महिन्यांची आहे. 

पांगरा शिंदे येथील मयत संगीता रामा मारकळ यांचा विवाह तीन वर्षाआधी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच ‘तू दिसायला चांगली नाहीस, तुला स्वयंपाक येत नाही,’ असे म्हणून सतत मारहाण करीत त्रास नवरा देत होता. विविध कारणाने सतत नवरा बायकोमध्ये वाद व्हायचे. त्यामुळे रागाच्या भरात ‘मी तुझा काटाच काढतो’ असे म्हणून २१ जानेवारी रोजी पतीने निमित्त करून पांगारा शिंदे गावाबाहेरील बोल्डा नाल्यात पत्नीला घेऊन गेला. यानंतर संगीतास मारहाण करून तिला पेटवून दिले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. 

मारकळ दाम्पत्यास दोन मुली आहेत. यातील एक मुलगी दोन महिन्यांची आहे. चिमुकलीची मायेची सावली बापामुळे हरवली आहे. या घटनेमुळे पांगारा शिंदे येथे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी फिर्यादी नानाराव भुरके यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामा मारकळ याच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी सपोनि सुनील गोपीनवार, फोजदार सविता बोधणकर, पो. नायक गजानन भोपे यांनी पाहणी केली.
 

Web Title: Shocking! The husband took her to a secluded place and set her on fire; lost mother of two-month-old baby