शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:48+5:302021-09-11T04:29:48+5:30
हिंगोली : ग्रामपंचायत व पालकांच्या एनओसीनंतर कोरोनामुक्त भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या ...

शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
हिंगोली : ग्रामपंचायत व पालकांच्या एनओसीनंतर कोरोनामुक्त भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची कोणी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. दुसऱ्या लाटेने तर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे यावर्षी तरी शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, अनेक गावे कोरोनामुक्त झाल्याने पुन्हा शाळा सुरू होण्याची आशा निर्माण झाली. आता तर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. असे असले तरी ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्यासाठी पालक व ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यक करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात टप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात अहवाल शिक्षण विभागाकडे दाखल हेात आहेत. आतापर्यंत १२३ शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत असला तरी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळांकडून कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत; परंतु सॅनिटायझर, मास्क महत्त्वाचे असल्याने यासाठी विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शाळा सुरू करण्यापूर्वी वर्ग सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, वर्ग सॅनिटायझेशन करण्यासाठीचे पैसे कोण देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या तरी वर्ग सॅनिटायझेशन करण्याचा खर्च शाळा प्रशासनाला उचलावा लागत आहे.
तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच
मुले शाळेत आल्यानंतर त्यांची काळजी घेणे शाळेची जबाबदारी आहे. मात्र, शाळेबाहेर मुलांवर कसे लक्ष ठेवणार, असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित होत आहे.
-विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले होते. मात्र, अनेकांकडे मोबाइल व नेटवर्कचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.
- त्यामुळे शाळा प्रत्यक्ष कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी
जिल्ह्यात १२३ शाळा सुरू
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?
पहिली - २२८५२
दुसरी - २३१८५
तिसरी -२२११२
चौथी - २१८७४
पाचवी - २१३४२
सहावी - २१०३४
सातवी - २०७४०
आठवी - २०५३५
नववी - १९५१९
दहावी - १९४०७