रांची येथे कर्तव्यावर हजर होण्यास जाणाऱ्या सैनिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू; हिंगोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:06 IST2018-08-27T16:06:04+5:302018-08-27T16:06:18+5:30

आंधरवाडी रेल्वे परिसरात रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास एका सैनिकाचा मृतदेह आढळला.

Ranchi dies in train accident; The incident in Hingoli | रांची येथे कर्तव्यावर हजर होण्यास जाणाऱ्या सैनिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू; हिंगोली येथील घटना

रांची येथे कर्तव्यावर हजर होण्यास जाणाऱ्या सैनिकाचा रेल्वे अपघातात मृत्यू; हिंगोली येथील घटना

हिंगोली : तालुक्यातील आंधरवाडी रेल्वे परिसरात रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास एका सैनिकाचा मृतदेह आढळला. मृत सैनिकाचे नाव  प्रवीण शिवाजी गायकवाड (२३) असे असून ते झारखंड येथील रांची येथे कार्यरत होते. 

सविस्तर माहिती अशी की, हिंगोली येथील रेल्वेस्थानकाचा कर्मचारी चंदनकुमार हे पेट्रोलिंगसाठी जात असताना रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांना एक मृतदेह आढळुन आला. त्यांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील घटना असल्याने पोहेकॉ राजेश ठोके व पोना रविकांत हरकाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर प्रेत जिल्हा रूग्णालयात आणले. 

मृत प्रवीण गायकवाड हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी होते. ते सुटी संपवून कर्तव्यावर हजर होण्यासाठी रांची येथे होते. याच दरम्यान रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली  होती. कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मुलाचा मृतदेह डोळ्यासमोर आल्याने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. 

पिंपळदरी येथील सरपंच, मित्र परिवार व नातेवाईक शोकाकुल झाले होते. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोनि मारोती थोरात यांनी दिली. परंतु सैनिक प्रवीण गायकवाड हे कोणत्या रेल्वेने प्रवास करत असताना अपघात झाला हे मात्र कळू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Ranchi dies in train accident; The incident in Hingoli