'वसमतमधील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्या'; आमदार नवघरेंची अजित पवारांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:52 IST2023-07-28T14:49:00+5:302023-07-28T14:52:21+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली

'वसमतमधील अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्या'; आमदार नवघरेंची अजित पवारांकडे मागणी
- इस्माईल जाहागिरदार
वसमत: गुरुवारी शहरात २२५ मिमि पाऊस झाला. सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन गुरुद्वारा परिसरातील प्राचिन गाव तलाव फुटून शेकडो घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी करत आ. राजू नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
२७ जुलै रोजी शहरात ढगफुटी होऊन शहरातील गाव तलाव फुटून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात आ. नवघरे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. २७ जुलै रोजी वसमत तालुक्यात झालेल्या ढगफुटीबद्दल व गाव तलाव फुटुन नुकसान झाल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. नुकसानग्रस्त झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा...
आ. राजू नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत वसमत शहरात झालेल्या अतिवृष्टी व प्राचिन गाव तलाव फुटल्याची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.